औरंगाबाद : औरंगाबाद येथील गिर्यारोहक भूषण वेताळ यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असणारे माऊंट किलीमांजिरो नुकतेच सर केले.५ हजार ८९५ मीटर उंचीवर असणाऱ्या आफ्रिकेच्या टांझानिया येथील माऊंट किलीमांजिरो हे शिखर सर करण्यास भूषण वेताळ यांनी ६ मार्चला सुरुवात केली होती. त्याने कॅम्प १, कॅम्प २ आणि कॅम्प ३ असे गाठत ७ तासांत हे शिखर सर केले. त्याचा गाईड राफेल होता. या मोहिमेसाठी भूषण वेताळ हे १ मार्च रोजी रवाना झाले होते. त्यांचा ७ खंडांतील ७ उंच शिखरे पादाक्रांत करण्याचा मानस आहे. याआधी औरंगाबादची गिर्यारोहक व एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या मनीषा वाघमारे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे मनीषा वाघमारे यांनीदेखील २०१४ मध्ये माऊंट किलीमांजिरो हे शिखर सर केलेले आहे.भूषण वेताळ यांनी याआधीदेखील सह्याद्रीतील अनेक गड व किल्ले सर केले आहेत. तसेच ते चांगले मॅरेथॉनपटू आणि सायकलपटूदेखील आहेत. त्यांनी लेह ते खंर्दुगला हा अतिशय खडतर सायकल चालवून दोनदा पूर्ण केला आहे. तसेच २०० कि.मी. सायकल चालवून त्यांनी बीआरएम या सायकल रेस पूर्ण केल्या आहेत. एसबीआयमध्ये कार्यरत असणाºया भूषण वेताळ यांच्या या यशाबद्दल त्यांचे रजनीश कुमार, शेषूबाबू पल्ले, प्रताप हंदाळे, सुनील शिंदे, आशुतोष कुमार, राजेंद्र अनासपुरे, मदन कुलकर्णी, महेश गोसावी, वृषाली वर्तक आदींनी अभिनंदन केले आहे.
औरंगाबादच्या भूषणने केले माऊंट किलीमांजिरो सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:29 AM