भराडी येथील बसस्थानकावर अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटून व्यवसाय सुरू केले आहेत. शाळा व महाविद्यालये असल्याने खेड्यापाड्यातून हजारो विद्यार्थी भराडी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांना रस्त्यावरच बसची वाट पाहत उभे राहावे लागते. नुकतेच सिल्लोड ते कन्नड मार्गाचे काम झालेले असून हे काम भराडी बसस्थानकाजवळून गेले आहे. मात्र, नवीन रस्त्याचे काम हे जुन्या रस्त्यापेक्षा थोडे उंचीचे झाले असल्याने वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या दोन्ही साइडला उभे करीत आहेत. त्यामुळेसुद्धा प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मागील वर्षी परिसरातील नागरिकांनी हटवावे, अशी मागणी सिल्लोड बस आगाराकडे केलेली होती; परंतु अद्यापही बसस्थानक खुले झालेले नाही. तरी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बसस्थानकावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांमधून हाेत आहे.
फोटो : अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले भराडी येथील बसस्थानक.