औरंगाबाद : मार्च महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठवाडा साहित्य परिषदेकडून ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे नाव पाठविण्यात आले असून, या नावालाच परिषदेचा भक्कम पाठिंबा असेल, अशी माहितीही मिळाली आहे.
साहित्य परिषदेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांच्यासह आणखी एक नाव पाठविण्यात आले आहे. हे नाव स्पष्ट करण्यास सूत्रांनी नकार दिला. मात्र, हे साहित्यिक मराठवाड्यातीलच असल्याची पूरक माहिती दिली. यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार, याविषयीची उत्कंठा वाढत चालली आहे. संमेलनाध्यक्ष पदासाठी डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन वाघमारे यांची नावे विविध साहित्य संस्थांकडून पुढे आली आहेत. मात्र, साहित्य महामंडळ सध्या ज्या ठिकाणी आहे, त्या मराठवाडा साहित्य परिषदेतून मात्र संमेलनाध्यक्षाबाबत मौन पाळले जात होते. त्यामुळेच मराठवाडा साहित्य परिषदेकडून कोणाचे नाव यंदा पुढे होणार आहे, याबाबत मराठवाड्यात प्रचंड उत्सुकता आहे.
घटक संस्था आणि संलग्न संस्थांनी २० जानेवारीपर्यंत संमेलनाध्यक्षपदासाठीची नावे पाठवावीत, असे सूचित करण्यात आले होते. मराठवाडा साहित्य परिषदेकडून दोन नावे पाठविण्यात आली आहेत. या दोन नावांच्या शर्यतीत सासणे यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे समजते. २४ जानेवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या बैठकीत संमेलनाध्यक्ष कोण होणार, या चर्चेवर पडदा पडणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस साहित्य वर्तुळातील वातावरणात उत्सुकता ताणलेली असेल.