शेख मेहमूद । लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : आपले लाडके दैवत विठुमाऊलीचे आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांंनी मंगळवारी छोट्या पंढरपुरात अलोट गर्दी केली. मुखी विठ्ठलनामाचा जयघोष व टाळ मृदंगाच्या गजरात येणारे लाखो वारकरी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी रांगा लावून उभे होते. दिंड्या व भाविकांच्या गर्दीमुळे औद्योगिकनगरीला आध्यात्माचे भरते आले. रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगेची गर्दी ओसरली नव्हती. जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या हस्ते सोमवारी मध्यरात्री १२ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाभिषेक करण्यात आला. महाभिषेक झाल्यानंतर युवराज शिंदे व नम्रता शिंदे या दाम्पत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिराचे द्वार खुले करण्यात आले. मध्यरात्रीपासून वाळूज औद्योगिकनगरी तसेच जिल्हाभरातील भाविक, दिंड्यांतील वारकऱ्यांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. पंचक्रोशीतील लहान मोठ्या वसाहती, ग्राम, तांडे, वाड्यांमधून वारकरी पायी दिंड्या काढून कुटुंबासह पंढरपूरनगरीत दाखल झाले होते. शहरातील बाबा पेट्रोलपंपपासून वाळूजपर्यंत चोहीकडे वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाचा गजर कानी पडत होता. या रस्त्यावर शेकडो लहान मोठ्या दिंड्या विठुमाऊलीच्या भेटीच्या ओढीने झपाझप पावले टाकत निघाल्या होत्या. त्यात तरुण-तरुणी, बालके, महिला आणि वयोवृद्ध आदी सर्वच वयोगटांचा भरणा होता. वारकरी व भाविकांचे लोंढेच्या लोंढे येत असल्याने छोटे पंढरपूर भक्तिसागरात बुडाले होते.भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्ट व पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या होत्या. यंदा प्रथमच महिला व पुरुषांची एकच दर्शन रांग ठेवण्यात आली होती. दिंड्यांतील वारकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करून त्यांना सरळ दर्शनाचा लाभ देण्यात आला. सकाळपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने तिरंगा चौक व कामगार चौकापासून लांबच लांब रांगा लागल्या. रात्री उशिरापर्यंत जवळपास ७ ते ८ लाख वारकऱ्यांनी दर्शन घेतल्याचा अंदाज ट्रस्टी व पोलिसांनी वर्तविला. मोठा पोलीस बंदोबस्तपोलीस व ट्रस्टीच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, ज्ञानोबा मुंडे, डॉ.नागनाथ कोडे, वाहतूक शाखेचे निरीक्षक एल. ए. शिनगारे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यात्रा सुरळीतपणे पार पडावी, यासाठी विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर पा. शिंदे, ह.भ.प. भिकाजी खोतकर, विठ्ठल वाकळे, राजेंद्र पवार, गणेश नवले, पंढरपूरचे सरपंच गौतम चोपडा, उपसरपंच महेंद्र खोतकर, पं.स. सदस्या शमीमबी चौधरी, हरिभाऊ शेळके, वळदगावचे सरपंच राजेंद्र घोडके यांच्यासह वळदगाव-पंढरपूरच्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.रस्त्यारस्त्यांवर खेळ मांडियेला...वारकऱ्यांच्या दिंड्या सोमवारी रात्रीपासून दाखल होत होत्या. त्यामुळे औद्योगिकनगरीतील रस्ते गर्दीने फुलून गेले. हे वारकरी विठुनामाचा जयघोष करीत होते. ठिकठिकाणी अभंग, कीर्तन व भजने गायली जात होती. यंदा २५० दिंड्या सहभागी झाल्याचे ट्रस्टींनी सांगितले.
उद्योगनगरीला आध्यात्माचे भरते!
By admin | Published: July 05, 2017 12:33 AM