औरंगाबाद : वडिलांना न सांगता चार मित्रांसह कार घेऊन बाहेर पडलेल्या तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट कार दुभाजकावरील एकापाठोपाठ १४ जाळ्या तोडून आदळली. यावेळी कारमधील दोन्ही एअरबॅग उघडल्याने कारमधील सर्व तरुण बालंबाल बचावले. हा भीषण अपघात मंगळवारी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाणपुलावर घडला. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले.
अथर्व अरुण टेकाळे (वय १८, रा. नंदादीप हाउसिंग सोसायटी, हर्सूल टी-पॉइंट परिसर) याच्यासह चार तरुणांचा यात समावेश आहे. अथर्वच्या मावशीचे जळगाव रस्त्यावरील खाजगी रुग्णालयात ऑपरेशन असल्याने त्याच्या वडिलांसह तो रुग्णालयात गेला होता. यावेळी त्याचे वडील टेबलवर त्यांच्या कारची चावी ठेवून बसले होते. तेव्हा अथर्वने ही चावी घेतली आणि तो कार घेऊन तेथून बाहेर पडला. यानंतर त्याने त्याच्या तीन मित्रांना कारमध्ये बसविले आणि त्यांना घेऊन फेरफटका मारण्यासाठी जालना रोडवर आला. आकाशवाणी चौकाकडून वसंतराव नाईक चौकाकडे ते जात असताना सेव्हन हिल उड्डाणपुलावर त्यांचे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट कार पुलाच्या मध्यभागी दुभाजकावर चढून एकापाठोपाठ तेथील १४ जाळ्या तोडत पुढे निघाली. यावेळी
एक एक जाळी उडून रस्त्यावर पडत होती. काही जाळ्या कारसोबत फरपटत पुढे जाऊन समोरील जाळीत अडकल्याने कार जोरात आदळून थांबली. यावेळी एक रॉड थेट कारची काच फोडून आत घुसला. मात्र, कारमधील दोन्ही एअरबॅग उघडल्याने अथर्वसह त्याचे मित्र बालंबाल वाचले. या घटनेत कारचे इंजिन तुटल्याने कारमधील ऑइल रस्त्यावर सांडले.
चौकट
अनेक जाळ्या उडून पडल्या रस्त्यावर
या अपघातात एक- एक जाळी तुटून रस्त्यापासून दूर फेकल्या गेल्या. सुदैवाने अन्य वाहनचालकांना या जाळ्या लागल्या नाहीत आणि एकही वाहनचालक या जाळ्यात अडकून पडला नाही. या घटनेची माहिती अथर्व याने फोन करून त्याच्या वडिलांना सांगितली.
---------------
प्राचार्यांची कार
फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील एका महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या अरुण टेकाळे यांची ही कार असल्याचे समोर आले. अपघाताची माहिती मिळताच प्रा. टेकाळे हे नातेवाइकांसह घटनास्थळी दाखल झाले.
------------------
नाकाबंदीवरील पोलिसांची घटनास्थळी धाव
आकाशवाणी चौकात पोलीस उपनिरीक्षक शिक्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी नाकाबंदी करीत होते. एका वाहनचालकाने त्यांना या अपघाताची माहिती देताच त्यांनी कर्मचाऱ्यांसह तेथे धाव घेतली. पोलिसांना पाहून कारमधील तरुण पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवून धीर दिला.