औरंगाबाद : मराठवाड्याचे प्रख्यात व अस्सल लोककलावंत भारूडरत्न निरंजन मुरलीधर भाकरे यांचे आज घाटी रुग्णालयात निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. एकनाथ महाराजांचा बुरगुंडा त्यांनी विशेष लोकप्रिय केला. झी युवा, झी टॉकीज या वाहिन्यांवर निरंजन भाकरे खूप गाजले. विविध पुरस्कारांचे धनी असलेले निरंजन भाकरे यांचे २०२१ च्या पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. त्यांना २००७ साली लोककला सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढे ते २०११ मध्ये या पुरस्काराच्या निवड समितीवर आले. २०१७ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्काराने ते सन्मानित झाले. रहिमाबाद, तालुका सिल्लोड हे त्यांचे मूळ गाव. घरची परिस्थिती बेताचीच. प्रारंभीच्या काळात भाकरे यांनी ताटे आणि टोपली यांनाच वाद्य बनवून मजुरांच्या समोर करमणुकीचे कार्यक्रम केले. त्यातूनच ते घडत गेले. अशोक परांजपे, अशोक हांडे आणि अशोक पत्की या तिघांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना भरपूर संधी मिळत गेली. मराठी बाणा या कार्यक्रमातून भाकरे यांचे भारुड देश व विदेशातही गाजले. अशोक पत्कींनी त्यांना चित्रपटात भूमिका दिल्या. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाद्वारे निरंजन भाकरे घराघरात पोहोचले.
त्या झब्ब्याची नोंद...
निरंजन भाकरे यांनी १०० मीटर कापडाचा झब्बा शिवून त्यावर मुंबईत आयएनटीमध्ये तीन तास कार्यक्रम केला होता. हा झब्बा आजही त्यांच्याकडे आहे. या झब्ब्याची नोंद घेतली गेली आहे.
मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये....
निरंजन भाकरे हे राष्ट्रीय कार्यक्रमांचे भाष्यकार होते. आपल्या कलेद्वारे राष्ट्रीय कार्यक्रम जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात ते यशस्वी होत असत. ज्या गावात त्यांचा कार्यक्रम असे, त्या गावात त्या दिवशी जर मुलगी जन्माला आली तर पाच हजार रुपये बक्षीस रूपाने देऊन निरंजन भाकरे त्या मुलीचा सन्मान करीत असत. तसेच नवरा म्हणून शेतकरी मुलाला पसंती देणाऱ्या मुलीचा १००० रुपये देऊन सन्मान करीत असत. शिवाय, गावातील पाच आदर्श कुटुंबातील महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान करीत असत.
देहदानाची इच्छा अपूर्णच....
दिवंगत निरंजन भाकरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शेखर, तीन मुली, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर भाकरे यांना आधी चिखलीच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. प्रकृती खालावत गेल्याने १७ एप्रिल रोजी औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर औरंगाबादेतच अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१६ मध्येच भाकरे यांनी मृत्यूनंतर देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यांची ती इच्छा कोरोनाने पूर्ण होऊ दिली नाही.