वाळूज महानगर : राज्याचे रोलमॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादजवळील आदर्श गाव असलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीत आदर्श सरपंच भास्कर पेरे पर्वाचा अस्त झाला असून, ग्रामविकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या पॅनलच्या ८ जागा बिनविरोध आल्या असून, सोमवारी झालेल्या मतमोजणीत उर्वरित ३ जागांवर या पॅनलचे उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे विद्यमान सरपंच भास्कर पेरे यांच्या कन्या अनुराधा पेरे यांचा १८ मतांनी पराभव झाला.
राष्ट्रपती पुरस्कारासह विविध पुरस्कार पटकाविणाऱ्या आदर्श पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक यंदा एकतर्फीच झाली. या निवडणुकीत विद्यमान सरपंच भास्कर पा. पेरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या समर्थक सदस्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. गत अडीच दशकापासून सत्तेत असलेल्या भास्करराव पेरे यांच्या विरोधात बबनराव पेरे, चंद्रकांत पेरे व कपिंद्र पेरे यांनी दंड थोपटत ग्रामविकास लोकशाही पॅनल स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. मात्र, भास्कर पेरे व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामविकास लोकशाही पॅनलचे ८ उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित ३ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत या पॅनलच्या जयश्री किशोर दिवेकर, मंदा खोकड व मीरा जाधव या विजयी झाल्या. या निवडणुकीत भास्कर पेरे यांच्या कन्या अनुराधा पेरे यांना १८६, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मीरा जाधव यांना २०४ मते मिळाली. या ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चव प्रस्थापित केल्यानंतर ग्रामविकास लोकशाही पॅनलचे प्रमुख बबनराव पेरे, चंद्रकांत पेरे, कपिंद्र पेरे व नवनिर्वाचित सदस्यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन गुलाल उधळत जल्लोष केला.
अडीच दशकानंतर सत्तांतरण
आदर्श पाटोदा-गंगापूर ग्रामपंचायतीमध्ये भास्कर पेरे यांची अडीच दशकापासून एकहाती सत्ता होती. गत पंचवार्षिक निवडणुकीत भास्कर पेरे यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, अल्पशा मतांनी भास्कर पेरे यांचा पराभव झाला होता. यानंतर काही दिवसांनी भास्कर पेरे यांच्या विरोधात विजय मिळविलेल्या चंद्रकांत पेरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भास्कर पेरे यांची बिनविरोध निवड झाली होती. यंदाच्या निवडणुकीत गावातील मतदारांचा मूड बघूृन भास्कर पेरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू आहे.
फोटो ओळ- आदर्श पाटोदा ग्रामपंचायतीत हस्तांतरण झाल्याने बिनविरोध व विजयी झालेल्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. याप्रसंगी पॅनल प्रमुख बबनराव पेरे, चंद्रकांत पेरे, कपिंद्र पेरे, आदी दिसत आहेत.
फोटो क्रमांक-जल्लोष १/२/३
------------------------