औरंगाबाद : स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काढण्यात आलेली अभिवादन रॅली भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना रविवारी सकाळी अर्ध्यातूनच गुंडाळावी लागली.भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शहरातील काही महापुरुषांच्या पुतळ्याला वाहन रॅलीद्वारे अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे सुभेदारी विश्रामगृहापासून येथे सकाळपासूनच कार्यकर्त्यांचे जथे जमा झाले. सकाळी ११.३० वाजता सुभेदारी विश्रामगृहापासून रॅलीला सुरुवात होणार तोच उत्तर प्रदेश येथील काही कार्यकर्त्यांनी गुगल मॅपवरून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अंतर तपासले. पुतळा अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याचे त्या कार्यकर्त्यांनी आझाद यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकीऐवजी पायी चालत जाणे पसंत केले. सुभेदारी विश्रामगृहापासून भडकल गेटजवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अंतर दोन-अडीच किलोमीटर आहे, असे भीम आर्मीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगण्याचा बराच प्रयत्न केला; पण चंद्रशेखर आझाद ऐकतील तेव्हा. त्यांनी कोणाचे काही एक ऐकून न घेता ते तडख हातात तिरंगा ध्वज व संविधानाची प्रत, गळ्यात निळे उपरणे टाकून पायी निघाले. कार्यकर्त्यांचा घोळकाही मग त्यांच्यासोबत पायीच चालत निघाला. चालत चालत ते पुतळ्याजवळ आले तोपर्यंत त्यांची चांगलीच दमछाक झाली होती. पुष्पहार अर्पण करून त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.पुढे मिलकॉर्नर येथे राजर्षी शाहू महाराज, क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज, सिडको बसस्थानक चौकाजवळ वसंतराव नाईक, हडको टीव्ही सेंटर येथे संभाजी महाराज आणि शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता केली जाणार होती. तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी पायी जाणे शक्य नसल्याचे सांगितले. तेव्हा आपली दिशाभूल झाली, असे चंद्रशेखर आझाद यांच्या लक्षात आले व त्यांनी ही रॅली भडकलगेट येथेच थांबविली व ते एका चारचाकी वाहनात बसून परत सुभेदारी विश्रामगृह येथे गेले. संतप्त चंद्रशेखर आझाद यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे गेल्यानंतर ते एका सूटमध्ये जाऊन बसले. बराच वेळ त्यांनी कार्यकर्ते तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटण्याचे टाळले. यावेळी मुंबई, मनमाड, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, बीड येथून बरेच कार्यकर्ते आले होते. त्यांचाही भ्रमनिराश झाला.
भीम आर्मीची अभिवादन रॅली अर्ध्यातच गुंडाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:12 AM