औरंगाबाद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी शनिवारी सायंकाळी क्रांतीचौकात जमलेल्या आंबेडकरी अनुयायांचे ‘भीम’दर्शन सर्वांना घडले. मुख्य मिरवणुकीसाठी चोहोबाजूने भीमसागर उसळला होता. ‘भीत नाही कोणाच्या बापाला ही भीमाची पोरं’, ‘मेरा भीम जबरदस्त’ आदी डीजेवर वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांवर सारे जण बेभान नृत्य करीत होते. काही संघटनांच्या मंचावर ‘भीमगीतांचा जलसा’ ऐकण्यात अनेक जण तल्लीन झाले होते. अधूनमधून ‘जोर से बोलो जयभीम’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ असा गगनभेदी जयघोष अन् ढोल-ताशांचा वादनाने सारे वातावरण दणाणून गेले होते.
मानवता आणि समानतेचा संदेश देणारे, दीनदलितांचा श्वास असणारे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीचौकातून निघालेली मिरवणूक अविस्मरणीय ठरली. भीम ऐक्याचे दर्शन घडविणारी ही मिरवणूक ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी भीमसैनिकांची एवढी गर्दी जमली की, क्रांतीचौक ते पैठणगेटपर्यंत पायी जाणेही कठीण झाले होते. सायंकाळी पावणेसात वाजता जाणता राजा प्रतिष्ठानच्या ‘शिल्पकार’ या ढोल पथकाचे सर्वप्रथम क्रांतीचौकात आगमन झाले. निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या २० जणांच्या ढोल पथकाने सर्व वातावरण दणाणून सोडले. यानंतर पदमपुरा, मैत्रेय्या चौक येथील साहेब प्रतिष्ठानच्या ढोल व झांज पथकाने तेवढ्याच जल्लोषात सादरीकरण करून सर्वांना खिळवून ठेवले. जयहिंद स्पोर्टस् व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता सागर मगरे यांच्या पथकाने तलवारबाजी, दोरीवरच्या थरारक उड्या आदी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘खेल से चरित्र बनता है, चरित्र से देश’, ‘ सर्वधर्म समभाव’, ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ असे सामाजिक संदेशांचे फलकही यावेळी झळकविण्यात आले. ढोल पथकांचे सादरीकरण पाहण्यास प्रचंड गर्दी उसळली होती. मिरवणूक मार्गावर जागोजागी विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर आंबेडकरी बांधवांचे स्वागत करण्यात येत होते. मिरवणूक नूतन कॉलनी, सिल्लेखाना चौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौकमार्गे भडकलगेट येथे पोहोचली. मिरवणूक मार्गावर मध्यरात्रीपर्यंत तुफान गर्दी टिकून होती.देखाव्यांनी लक्ष वेधलेमुख्य मिरवणुकीत विविध राजकीय पक्ष व संघटनेच्या मंचावर उभारण्यात आलेल्या देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले. क्रांतीचौकात पँथर्स रिपब्लिकन पक्षाच्या व्यासपीठावर विजयस्तंभ उभारण्यात आला होता. भीमशक्ती सामाजिक संघटनेने भीमा-कोरेगाव येथील युद्धाचा देखावा साकारला होता. युवा प्रगती मित्रमंडळाने १२७ वी जयंती आकड्यात साकारली होती. तेथे उभे राहून अनेक जण फोटो काढत होते. संदीप शिरसाठ मित्रमंडळाने ‘मानवता धर्म, हाच इतिहास’ असा देखावा साकारला होता. भाजपच्या व्यासपीठावर ‘सिद्धार्थ मी तुला शोधत आहे’ यावर आधारित देखाव्यात गौतम बुद्धांच्या विविध रुपाचे दर्शन घडविण्यात आले. एमआयएमच्या व्यासपीठावर पृथ्वीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने महात्मा जोतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) यांच्या व्यासपीठावरील तथागत गौतम बुद्धांची मूर्ती व सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे आकर्षण ठरले. पैठणगेट येथे नागसेन मित्रमंडळ (बौद्धवाडा) यांनी ‘जगाला युद्ध नको बुद्ध हवा’ हा देखावा साकारला होता.वाहनातील देखावे आकर्षकसाहेब प्रतिष्ठानच्या वाहनात भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती व दोन्ही बाजूला गजराजची मूर्ती हा देखावा लक्षवेधी ठरला. बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, हमालवाडा येथील लुम्बिनी युवा मित्रमंडळ न्यायनगर, उस्मानपुरा येथील भीम ज्वाला मित्रमंडळ यांच्या वाहनांमध्ये गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. रमानगर मित्रमंडळाने तयार केलेली शेषनागावर बसलेली गौतम बुद्धांची मूर्ती नावीन्यपूर्ण ठरली. मिलिंद बुद्धविहार मित्रमंडळाने दीक्षाभूमीचा देखावा साकारला होता. त्रिशरण युवा मित्रमंडळाने भीमा-कोरेगावचा स्तंभ साकारला होता. देखाव्यांसमोर अनेक जणांनी सेल्फी काढले.तरुणाईने बहर आणलाशहरातील विविध भागांतून सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे दुचाकी रॅली निघत होत्या. यात तरुणांचा सहभाग सर्वाधिक होता. ‘जोर से बोलो जय भीम’, ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ असा जयघोष करीत तरुण वाहन रॅलीत सहभागी होत होते. जोश, जल्लोष करीत तरुणाईने बहर आणला. अनेक रॅली अशा होत्या की, त्यात २०० पेक्षा अधिक दुचाकींचा समावेश होता. काही रॅलींमध्ये उघड्या जीपच्या समोरील बाजूस डॉ. आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. पाठीमागील बाजूस असंख्य युवक दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. सर्व वाहन रॅली भडकलगेट येथे येत होत्या. यानंतर अभिवादन करून पुन्हा जयघोष करीत पुढे जात होत्या.भीमगीतांवर सारे थिरकलेमहामानवाच्या जीवनकार्याचा गौरव करणारी अनेक भीमगीते आज मिरवणुकीत डीजेवर वाजविण्यात आली. जागोजागी व्यासपीठावरून वाजविल्या जाणाºया भीमगीतांवर तरुणाई थिरकत होती. या भीमगीतांनी मिरवणुकीत उत्साह, नवचैतन्य निर्माण केले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) यांच्या व्यासपीठावर गायक अशोक निकाळजे आणि त्यांच्या सहकाºयांनी भीमगीत सादर करून सर्वांचे मन प्रफुल्लित केले.क्षणचित्रेमध्यरात्री १२ वाजता भडकलगेटसमोर आतषबाजी पाहण्यासाठी चोहोबाजूने गर्दी जमली होती.मध्यरात्रीपासूनच विविध संघटनांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकºयांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे सुरू झाले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकºयांच्या पुतळ्यास पुष्पहार घालताना फोटो काढले जात होते.काही संघटनांनी पाणी, अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.तथागत गौैतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके आवर्जून खरेदी करताना लोक दिसून आले.एका संघटनेच्या वतीने नशामुक्तीचा प्रचार केला जात होता.मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर जागोजागी विविध राजकीय पक्ष, संघटनातर्फे व्यासपीठ उभारण्यात आले होते.व्यासपीठावरील आकर्षक देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.