छत्रपती संभाजीनगर : इच्छाशक्ती असेल तर श्रमातून सोने करण्यासाठी यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. केवळ श्रम आणि १०० रुपयांच्या भांडवलावर पहाटेपासून फूलविक्री ते कुरडया, पापड, लोणचे, खारवडी विक्रीतून किमान दोन हजार ग्राहकांचे नेटवर्क शिवकन्या पाटील या महिलेने छत्रपती संभाजीनगरात उभे केले आहे.
शिवकन्या पाटील यांनी फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले असून सध्या इयत्ता १२ वीत प्रवेश घेतलेला आहे. गावाकडे बालपणी अनेकदा दुसऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीपासून अनेक कामे त्यांना करावी लागली. घरची शेती असून नसल्यासारखीच; त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.२००४ मध्ये त्यांचे लग्न झाले. खेड्यात राहणाऱ्या शिवकन्या छत्रपती संभाजीनगरात आल्या. पती खासगी कंपनीत कामाला; पण नोकरी कायमस्वरूपी नव्हती. परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी काम सुरू करायचे तर हाती पैसा नव्हता.
घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची धडपड करतानाच विविध दुकानांत नोकरी केली, पण कष्ट करूनही हाती पुरेसा पैसा येत नव्हता. इतरांसाठी मेहनत करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय का नको, असे म्हणत अवघ्या शंभर रुपये भांडवलावर शिवकन्या पाटील यांनी उदबत्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून मिळालेल्या अनुभवातून वैष्णवी महिला गृहोद्योगाची सुरुवात केली. प्रभावी मार्केटिंग व दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर गृहोद्योगात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची ही वाटचाल गृहिणींसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे आत्मविश्वासही वाढल्याचे त्यांनी सांगितले. भावांनी या कामासाठी त्यांना सहकार्य केले.
मागणीनुसार विविध पदार्थ..सुरुवातीला पापड, मैत्रिणीकडून आणलेल्या खारवड्या, इतर पदार्थ विक्रीस सुरुवात केली, त्यास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उदबत्तीचा व्यवसाय कायम ठेवून त्यांनी विविध पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. वडील, भाऊ व त्यांची पत्नी यांची कामात साथ मिळत गेली.