राज्यात १४३ शासकीय, ५८ कृषी विद्यापीठांच्या आणि १०४२ खाजगी पंजीकृत फळ रोपवाटिका आहे. यात विविध फळपिकांची कलमे, रोपे उपलब्ध आहेत. ही उपलब्ध कलमे, रोपे फळबाग लागवडीसाठी सुलभरीत्या उपलब्ध होतील, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मराठवाडा विभागात मोसंबी पिकाचे मोठे क्षेत्र असून उत्पादनासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. मोसंबी पिकाचे इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित दान लागवडीची प्रात्यक्षिके देण्यासंदर्भात प्रयत्न करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या प्रसाराच्या माध्यमातून उत्पादनात वृद्धी करता येईल. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२० - २१ मध्ये ७०.०८ कोटींचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आले. सन २०२१-२२ वर्षात याच योजनेसाठी २३४.१४ कोटींचा कृती आराखडा केंद्र शासनास सादर करण्यात आला असल्याचे भुमरे यांनी स्पष्ट केले.
----- पाचशे रोपवाटिका उभारण्याचे नियोजन ----
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेतून सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ वर्षात प्रत्येकी ५०० रोपवाटिका उभारण्याचे नियोजन आहे. सन २०२१ मध्ये आजपर्यंत त्यापैकी १९४ भाजीपाला रोपवाटिका उभारण्यात आल्या आहेत. उर्वरित रोपवाटिका लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही भुमरे यांनी दिल्या.