सुनील घोडके
खुलताबाद : पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे काम निधीअभावी दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे या इमारतीचे भूमिपूजन मंत्री अदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालेले आहे. पंचायत समितीचे कार्यालयीन कामकाज शिक्षण विभागाच्या छोट्या जागेत सुरू असून सभापती, उपसभापतींचे दालन कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात भरविण्यात आले आहेत. त्यात सततच्या पावसाने उपसभापतींचे दालन गळू लागल्याने मोठी गैरसोय होत आहे.
खुलताबाद पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ३० ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. २ कोटी ५७ लाख ६५ हजार रुपये खर्चाच्या प्रशासकीय इमारतीच्या कामास कोविडमुळे दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. या इमारतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत शासनाने फक्त ४० लाख रुपयेच निधी सहा महिन्यांपूर्वी दिला आहे. गुत्तेदाराने जवळपास पावणेदोन कोटी रुपये खर्च केला आहे. पुढे निधी मिळत नसल्याने गुत्तेदारही काम करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते.
प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या पं.स.चे कार्यालयीन कामकाज शिक्षण विभागाच्या इमारतीच्या छोट्याशा जागेत सुरू आहे. सभापती, उपसभापतीचे दालन व एमआरईजीएस व इतर काही विभाग कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात हलविले आहे. ही निवासस्थाने जीर्ण झाली असल्याने ती पावसाळ्यात गळू लागली आहेत. उपसभापती युवराज ठेंगडे यांचे दालन पावसामुळे गळू लागले आहे. यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम लवकर होणे आवश्यक आहे.
कोट...
शासनाकडे पूर्ण रकमेची मागणी केली
खुलताबाद पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडे पूर्ण रकमेची मागणी केली आहे. लवकर निधी मिळाला तर, सहा महिन्यांत प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होईल.
- डी.यू. बनसोड, शाखा अभियंता, पं.स. खुलताबाद
कोट
वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने अडचण
पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नियोजन जिल्हास्तरावरून चालते. बांधकामाला निधी वेळेवर मिळत नसल्याची अडचण आहे. ठेकेदाराने वेळेवर काम पूर्ण करावे, यासाठी उपअभियंता जि. प. बांधकाम यांना वेळोवेळी सांगितले आहे. प्रशासकीय इमारतीचे काम लवकर पूर्ण व्हायला पाहिजे.
- प्रवीण सुरडकर, गटविकास अधिकारी, पं.स. खुलताबाद
फोटो कॅप्शन :१) खुलताबाद पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे रखडलेले काम.
२) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खुलताबाद पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करतानाचे जुने छायाचित्र.