औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटजवळ नामांतर लढ्यातील शहिदांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज सकाळी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते झाले. हे स्मारक नवीन पिढीसाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपान यावेळी कुलगुरू येवले यांनी केले. दरम्यान, नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ परिसरातील नामांतर शहीद स्तंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती.
यावेळी कोविडचे नियम पाळत विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, प्रभारी कुलसचिव दिलीप भरड, नामांतर शहीद स्मारक समितीच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा अहिरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, अधिसभा सदस्य सुनील मगरे, ॲड. विजय सुबुकडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान आदी उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. येवले म्हणाले की, विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे तमाम आंबेडकरी अनुयायीच नव्हे, तर सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. आजच्या दिवशी नामविस्तार दिनाचे औचित्य साधून नामांतर लढ्यातील शहिदांच्या स्मारकांचेही भूमिपूजन होत आहे. हे स्मारक नवीन पिढीसाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरेल. विद्यापीठ गेटच्या सुशोभिकरणाचे कामही येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून यामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट होईल.
कार्यकर्त्यांनी मानले कुलगुरुंचे आभारया भूमिपूजन समारंभानंतर बाबूराव कदम, गौतम खरात, गौतम लांडगे, किशोर थोरात, प्रा. सुनील मगरे, डॉ. शंकर अंभोरे, ॲड. विजय सुबुकडे, नागराज गायकवाड, अरुण शिरसाट, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, प्रकाश इंगळे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, कुणाल खरात, सचिन बोर्डे, आनंद कस्तुरे आदी आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरुंच्या निवासस्थानी जात त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
विद्यापीठ गेटवर अनुयायांची गर्दी नामविस्तार दिनानिमित्त नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच विद्यापीठ गेट परिसरात अनुयायांनी गर्दी केली होती. गेट परिसरातील शहीद स्तंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.