छत्रपती संभाजीनगर : कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी घालून दिलेल्या सुरक्षा नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मराठवाड्यातील १९० उद्योजकांविरोधात औद्योगिक सुरक्षा विभागाने विविध न्यायालयांत खटले भरले आहेत.
वाळूज एमआयडीसीतील सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्याेगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कारखाने अधिनयम १९४८ नुसार २२८९ कारखान्यांची आमच्या विभागाकडे नोंद आहे. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १३३६, जालन्यात २२८, परभणीत ५८, हिंगोलीत ३४, बीड २३८, नांदेड १९२, धाराशिव १०० आणि लातूरमध्ये १०३ कारखान्यांचा समावेश आहे. ज्या कारखान्यांची औद्याेगिक सुरक्षा विभागाकडे रीतसर नोंद आहे, त्या कारखान्यांनी औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे कंपनीमालक आणि व्यवस्थापकास बंधनकारक आहे.
औद्योगिक सुरक्षा विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कारखान्यांची तपासणी केली, तेव्हा १९० कारखान्यात सुरक्षा नियमांकडे कानाडोळा करण्यात आल्याचे दिसून आले. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या या कारखानदारांविरोधात न्यायालयात खटले भरण्यात आल्याची माहिती उपसंचालक धीरज खिरोडकर यांनी दिली.
अनेक कारखाने करीत नाहीत फॅक्टरीची नाेंद२० पेक्षा अधिक कामगार एकाच पाळीत काम करीत असलेल्या कारखान्याची औद्योगिक सुरक्षा विभागाकडे नोंद करण्याची जबाबदारी कंपनी मालक आणि व्यवस्थापकाची आहे. मात्र असे असूनही अनेक कंपन्यांकडून ही माहिती लपविली जाते. अशा कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापकांमध्ये औद्योगिक सुरक्षा नियमांबाबत जागरुकता निर्माण करून त्यांची या विभागाकडे नोंदणी करून घेतली आहे.