कॉंग्रेसला मोठा धक्का; मात्तबर नेत्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षा करणार भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 11:38 AM2022-08-04T11:38:28+5:302022-08-04T11:40:40+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी इनकमिंग
श्रीकांत पोफळे
करमाड (औरंगाबाद) : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मीनाताई शेळके आणि त्यांचे पती तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू काका शेळके समर्थकांसह आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. भाजपचे आ. हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा ते भाजपत प्रवेश करतील.
उस्मानपुरा येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयात हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पार पडणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. रामुकाका हे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे काम करत होते. काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ता ते कुंबेफळ गावचे सरपंच तर पुढे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होईपर्यंत रामू काका शेळके हे काँग्रेसची एकनिष्ठ होते.
माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नंतर फुलंब्री मतदार संघात तथा औरंगाबाद तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यात रामू काका शेळके यांचा सिंहाचा वाटा आहे. आगामी काळात रामू काका शेळके हे विधानसभेचे उमेदवार म्हणून देखील त्यांच्याकडे बघितल्या जात होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने रामू काका शेळके सारख्या बड्या नेत्याला भाजपमधून काय मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. रामू काका शेळके यांच्या भाजपा प्रवेशामुळे हरिभाऊ बागडे यांच्यानंतर फुलंब्री विधानसभेचे आस लावून बसलेल्या अनेक नेत्यांचे धाबे दणाणणार आहे हे मात्र नक्की.