छत्रपती संभाजीनगर : शहरासह संपूर्ण मराठवाड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तुषार राजपूत (४२, रा. गारखेडा), प्रवीण कुरकुटे (४०, रा. एशियाड काॅलनी), कल्याणी देशपांडे (५५, रा. पुणे) यांच्यासह त्यांच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. देहविक्रीमध्ये मराठवाड्यात पहिल्यांदाच कठोर कारवाई झाल्याने सेक्स रॅकेटला धक्का बसला आहे.
सिडको पोलिस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी टी. व्ही. सेंटर परिसरातील प्रा. सुनील तांबट (५४), संदीप पवार (३२) यांना शिकवणीच्या इमारतीतच देहविक्री करताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या चौकशीत तुषारने जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू केल्याची माहिती मिळाली होती. उपायुक्त नवनीत काँवत यांनी स्वत: बागवडे यांच्या पथकासह १६ जानेवारी रोजी त्याला अटक केली. या कारवाईत उझबेकिस्तानच्या २८ वर्षीय तरुणीसह ३ पीडिता आढळल्या होत्या.
२० वर्षांपासून एजंट, ६ पेक्षा अधिक गुन्हेतुषार गेल्या २० वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवतो. देशभरातील बड्या एजंटसोबत त्याचा संपर्क आहे. पुण्याची लेडीडॉन कल्याणीचे पहिल्यांदाच मराठवाडा कनेक्शन समाेर आले. २०१६ मध्ये तिच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तुषार, प्रवीणला शेवटचे १७ ऑक्टोबर २०२० रोजी बीड बायपासवर रॅकेट चालवताना अटक झाली होती. तुषारवर ६, तर प्रवीणवर ३ गुन्हे दाखल आहेत.
- तुषारच्या वारंवार रॅकेटमधील सहभागामुळे उपायुक्त काँवत यांनी मोक्कासाठी (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) आयुक्त मनोज लोहिया यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. सहायक आयुक्त धनंजय पाटील, रणजित पाटील, निरीक्षक संदीप गुरमे, ब्रह्मा गिरी, गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, द्वारकादास भांगे, महादेव दाणे, दीपाली सोनवणे यांच्या पथकाने मोक्कासाठी प्रक्रिया पार पाडली. तुषारवर रॅकेट प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी मोक्काच्या कारवाईचे आदेश जारी झाले.
- सहायक फौजदार द्वारकादास भांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९९ मध्ये संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर कारवाईसाठी हा कायदा पारित झाला. मोक्कासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. अटकेतील आरोपींपैकी एकावर दहा वर्षांत दोन गुन्ह्यांत आरोपपत्र सादर झालेले असणे बंधनकारक आहे. या कायद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात.
- मोक्काअंतर्गत पोलिस ४० दिवसांपर्यंत पाेलिस कोठडीची मागणी करू शकता. दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद यात आहे.