छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा खर्च २२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यातील सर्वाधिक खर्च उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांसह इतर प्रकारच्या छपाईवर केला जात आहे. ही छपाई विद्यापीठातच करावी, अशी मागणी करणारा ठराव अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांनी मांडला. त्यावर कुलगुरूंनी येत्या वर्षापासून ही सर्व प्रकारची छपाई विद्यापीठात केली जाईल, अशी घोषणा केली. त्यावर सदस्यांनी बाके वाजवून स्वागत करीत असे झाल्यास विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कुलगुरूंचा सत्कार करण्याचे जाहीर केले.
विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. बैठकीत सकाळच्या सत्रात प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावर दुपारच्या सत्रात चर्चा झाली. डॉ. शंकर अंभोरे, प्रा. सुनील मगरे, प्रा. बंडू सोमवंशी, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. भगवानसिंग डोभाळ आदींनी अर्थसंकल्पावर चर्चा केली. त्यानंतर ३०२ कोटी ५८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीलाच कुलगुरूंनी ‘इल्याव्हेटिंग एज्युकेशन : ए स्ट्रॅजिक व्हिजन फॉर द युनिव्हर्सिटी’ या विषयावर पॉवर पॉइंटद्वारे सादरीकरण केले. आगामी पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. बैठकीस ५२ सदस्य उपस्थित होते.
हे ठराव मंजूर- महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या निलंबन, बडतर्फीपूर्वी विद्यापीठाची परवानगी घ्यावी, हा डॉ. विक्रम खिलारे यांनी मांडलेला ठराव पुन्हा एकदा बहुमताने मंजूर करीत व्यवस्थापन परिषदेकडे पाठविण्यात आला.- येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील पद्धत बंद करून ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी घोषणा केली. त्याविषयी डॉ. उमाकांत राठोड यांनी ठराव मांडला.- विद्यापीठाला कॉमन परिनियम (स्टॅट्युट) तयार होईपर्यंत विद्यापीठात स्वत:चे परिनियम बनविणार. त्याविषयीचा ठराव डॉ. अंकुश कदम यांनी मांडला.- उत्कृष्ट पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयांचा होणार सन्मान. याविषयीचा ठराव डॉ. सतीश गावित यांनी मांडला. तो बहुमताने मंजूर केला.