छत्रपती संभाजीनगर: पैठण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षांचा प्रवासी राहिलेले दत्ता गोर्डे यांनी आज मुंबईत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. गोर्डे यांना पक्षात घेऊन शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.
गोर्डेहे मूळचे शिवसेनेचे होते. ते उघडपणे भुमरे यांच्याविरोधात भूमिका घेत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर शिवसेनेतून त्यांची हाकलपट्टी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर गोर्डे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि सन २०१९ची पैठण विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढविली. या निवडणूकीत भुमरे यांनी त्यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता.
गोर्डे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या गोर्डें यांच्या घरवापसीमुळे अजित पवार गटाला पैठण मध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत आज माजी सभापती, सुरेश दुबाळे ,प्रा. वि.आर.थोटे , माजी उपाध्यक्ष आपासाहेब गायकवाड, प्रवीण शिंदे आदी जणांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. यासोबतच वैजापूर येथील वैद्यकीय व्यवसायिक डॉ. राजू डोंगरे व संभाजी नगर पूर्वमधील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनीही आज शिवबंधन बांधले.