छत्रपती संभाजीनगर : अभिनेता सलमान खान याच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबारासोबतच त्याच्या पनवेल फार्महाउसवर हल्ला करून जिवे ठार मारण्याचा कट होता. या कटात शहरातील जालाननगरचा रहिवासी वस्पी मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना (३६) याचाही सहभाग होता. त्याच्यावर हल्ल्यासाठी शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे आता मुंबई पाेलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहे.
१४ एप्रिल रोजी सलमानच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुमारे सहा संशयितांना हरयाणा, पंजाब, राजस्थानमधून अटक केली. यात प्रामुख्याने सोनू सुभाष चंदर, अनुज थापन यांनी हल्लेखोरांना ४० काडतुसे पुरवली होती. हे दोघेही बिष्णोई गँगचे सदस्य आहेत. त्यांनी सागर पाल यास ४ मॅगझिन व ४० काडतुसे पुरवली होती. त्यापैकी ५ गोळ्या सलमानच्या घरावर झाडण्यात आल्या होत्या. अटकेतील या आरोपींच्या चौकशीत त्याच्या फार्म हाउसवरदेखील हल्ल्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये पनवेल पोलिसांनी वसीम चिकनासह धनंजय सिंग तापेसिंग, अजय कश्यप, गौरव भाटिया, एलियास नखवी, झिशान खान जावेद खान यांना अटक केली.
शस्त्र बाळगल्याप्रकरणी यापूर्वी अटकमूळ जालानगरचा रहिवासी असलेला वसीम सातत्याने परराज्यात वास्तव्यास होता. त्याचा बिष्णोई गँगच्या सदस्यांसोबत सातत्याने संपर्क असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सलमानच्या फार्म हाउसची रेकी करून शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. त्याने त्यासाठी आसपास भाड्याने खोलीसाठीदेखील शोध घेतला होता. त्याचा भाऊ हॉटेलमध्ये काम करतो. अनेक वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता. तेव्हा त्याला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकदेखील झाली होती.