छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेने आजवर शोधलेल्या सुमारे १५ ते १६ हजार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे साडेतीन लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल, असा दावा विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी मंगळवारी केला. एका पुराव्याच्या आधारे सुमारे २० जणांना वंशावळीप्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल, अशी शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयुक्त आर्दड म्हणाले, १८९१ साली झालेल्या जनगणनेतील काही पुरावे आढळले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये कमी पुरावे आढळले असून, सध्या शोधमोहीम सुरू आहे. येणाऱ्या काळात आणखी पुरावे आढळतील.
किती प्रमाणपत्रांचे वाटप?मराठवाड्यात सध्या १५० हून अधिक कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर ५०, तर धाराशिव जिल्ह्यात ६७ हून अधिक प्रमाणपत्र दिले आहेत.
मराठवाड्यात किती आढळल्या नोंदी?अभिलेख तपासणी - १ कोटी ७४ लाख ४५ हजार ४३२कुणबी नोंदी - १३ हजार ४९८
प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्षजिल्हा कक्ष कार्यकारिणी गठित करून प्रत्येक जिल्ह्यात अभिलेख पडताळणीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे आणि पात्र व्यक्तींना मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी कक्षाची मदत होणार आहे. न्या. शिंदे समितीच्या निर्देशाने विशेष कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात केली आहे.