छत्रपती संभाजीनगर : बहुराष्ट्रीय ऑडी कंपनीच्या क्यू ३ आणि क्यू ३ स्पोर्ट्सबॅक या दोन मॉडेलचे उत्पादन आता मेड इन इंडियाच नव्हे तर मेड इन छत्रपती संभाजीनगर असे असणार आहे.
येथील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील स्कोडा ऑटो- फोक्स वॅगन प्लँटमध्ये या मॉडेलच्या कारच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. याविषयीची माहिती ऑडी इंडिया कंपनीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. ही बाब छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसाठी भूषणावह असल्याचे मानले जात आहे.
ऑडी कंपनीने त्यांच्या ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार कंपनीने भारतीय ग्राहकांच्या पसंतीला महत्त्व दिले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार स्कोडा कंपनीच्या प्रकल्पात याची सुरुवात केली. येथील स्कोडा कंपनीत फोक्स वॅगनच्या कार असेम्बल केल्या जातात. यासोबतच येथे ऑडीच्या काही मॉडेलची निर्मिती होणार आहे. भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून या कारची डिझाइन करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.