औरंगाबाद : औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम (डीफार्मसी) परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव अक्षय जोशी यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
प्रथम वर्षातील फार्मासुटीकल केमेस्ट्री विषयाचा पेपरचे ६० गुणांचे २ मुख्य प्रश्नाचे उपप्रश्न टाईप करून सोशल मीडियावर व्हायरल झाले. सकाळी साडे नऊ वाजता पेपर सुरू झाला. साडे दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला तर साडे बारा वाजता पेपर संपला. सोशल मीडियावर व्हायरल प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाणून प्रश्नपत्रिकेची छाननी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली.
पहिला आणि दुसऱ्या प्रश्नांमध्ये साम्य आढळल्याचे मंडळ अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी मंडळाने वरिष्ठ कार्यालयाला कळविले. पेपर रद्द करणे किंवा इतर प्रकरणावर वरिष्ठ कार्यालय निर्णय घेऊ शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परीक्षेतील पुढील पेपरच्या अनुषंगानेही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.