छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम ७६ टक्के झाले आहे. उर्वरित काम गतीने व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आयुक्तालयात बैठक झाली. यात पाइपलाइनच्या कामासाठी चितेगाव येथे ‘डायव्हर्शन’ घेण्याचा निर्णय झाला. यासाठी १० डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान चितेगाव येथील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहनधारकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. याबाबत ग्रामीण पोलिस अधिसूचना काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
योजनेच्या कामासाठी ग्रामीण पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाची मदत घेण्यात येत आहे. पाइपलाइन पुढे टाकण्यासाठी चितेगाव येथे ‘डायव्हर्शन’ घेण्याची गरज आहे. चितेगाव येथे ‘डायव्हर्शन’ असल्याने या रस्त्यातील वाहतूक वळविण्याबाबत पोलिस अधीक्षकांकडून अधिसूचना काढण्याचे बैठकीत ठरले. १० डिसेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. बैठकीला पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरणचे अधिकारी, योजना गुत्तेदार प्रतिनिधी उपस्थित होते.
कंत्राटदाराने अडीच महिने मागितले होतेपाइपलाइनच्या मार्गातील विद्युत खांब काढणे, अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधीची मागणी कंत्राटदाराने केली होती. वाहनधारकांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे दोनऐवजी तीन टीम लावून १० डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. चितेगाव येथे पाइपलाइन टाकताना रस्त्याच्या कडेला सुमारे ७२० मीटर अंतराचे खोदकाम करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद करावी लागेल. वाहनधारकांसाठी पर्यायी रस्ता देण्यात येणार आहे.
पैठणला जाण्यास होणार उशीर ....केंद्र, राज्य आणि मनपाच्या निधीतून शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी २५०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. जीव्हीपीआर कंपनीने हे काम घेतले आहे. चितेगाव परिसरात ७२० मीटर लाईन टाकण्यासाठी दीड महिना रस्ता बंद ठेवण्यासाठी जीव्हीपीआर कंपनीला परवानगी देण्याचे शुक्रवारच्या बैठकीत ठरले आहे. यामुळे पैठणकडे जाणाऱ्या उद्योजक, भक्तांना, नागरिकांना ४७ दिवस पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.