- विकास राऊतऔरंगाबाद : देशातील ३५ वे सी-बॅण्ड डॉप्लर रडार औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ याठिकाणी बसविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहालगतची जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
सहा महिन्यांपूर्वी हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी पाहणी करून हा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने रडार बसविण्याच्या मागणीपासून मंजुरी दिल्यानंतर स्थळनिश्चिती ते रडार बसविण्यासाठी निर्णय होईपर्यंत ‘लोकमत’ने १५ महिन्यांपासून पाठपुरावा सुरू ठेवला असून, त्यात यश आले आहे. हे रडार येणाऱ्या सहा महिन्यांत बसवून कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना बुधवारी पत्र दिले. अक्षांश व रेखांशच्या पूर्ण अभ्यासाअंती म्हैसमाळ हे ठिकाण रडार बसविण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, रस्ता, हायस्पीड इंटरनेट, थ्री फेज वीजपुरवठा, पथदिवे, सुरक्षा भिंतीसह इतर सुविधा रडार बसविण्यात येणाऱ्या जागेत द्याव्या लागणार आहेत. देशात असे रडार ३४ ठिकाणी आहेत. ३५ वे रडार औरंगाबादला मिळते आहे, यामुळे अचूक हवामान अंदाज मराठवाड्यातील शेतीसह सर्व क्षेत्रांसाठी महत्त्वाचा ठरेल. गारपीट, अतिवृष्टी, वादळांची माहिती यामुळे मिळेल. पुणे व मुंबई वेधशाळेच्या हवामान अंदाजावरच आजवर मराठवाडा अवलंबून राहिलेला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पाठपुराव्याचा उल्लेखही त्यांनी केला.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच आयएमडीची यंत्रणा...सी-डॉप्लर रडार कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान कमी होण्यास देखील रडारची मदत मिळेल. अचूक हवामानाची माहिती आल्यास इतर नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना शक्य होतील. स्वातंत्र्यानंतर प्रथमच आयएमडीची (इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट) स्वतंत्र यंत्रणा औरंगाबाद येथे उभारण्यात येत असल्याने मराठवाड्याचे भाग्य फळफळले आहे. हवामान अभ्यासकांना त्याचा फायदा होईल. रडारने टिपलेल्या दृश्यांमुळे अनेक अनुमान, संशोधने समोर येतील.
५० कोटींचा खर्च...सुमारे ५० कोटींच्या आसपास रडार उभारणीचा खर्च असेल. आयएमडी रडार व २४ बाय ७ राऊंड ॲन्टेना बसविण्यात येईल. हायस्पीड इंटरनेट आणि अखंड वीजपुरवठा लागेल.
‘लोकमत’मुळे पाठपुरावा करता आला...म्हैसमाळ हे ठिकाण उंचीवर असल्याने आयएमडीने तेेथे रडारची यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’च्या वृत्त मालिकेतून मराठवाड्याला रडारची गरज का आहे, हे समोर आणल्यामुळे मला पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा करता आला.- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री