औरंगाबाद- शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या त्यांच्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. ही शिवसंवाद यात्रा नाशिकमधून औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी शिंदे गटातील आमदार रेमश बोरनारे यांचा मतदासंघ असलेल्या वैजापूर तालुक्यातील महालगाव इथे आदित्य ठाकरेंच्या सभेत मोठा राडा झाला. सभेवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सभा संपवून निघताना आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला आणि गाडीवरही दगडफेक झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महालगावमध्ये ही दगडफेक झाली आहे. आज माता रमाई यांची जयंती असल्याने गावात पूर्व नियोजित मिरवणूक सुरू होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना dj चा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाला.
यावेळी मिरवणुकीतील काही कार्यकार्ये संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरवात केली. आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेत भाषण उरकले. मात्र सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे गाडीत बसून जात असताना मिरवणुकीतील संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या पोलीस बंदीबस्तात आदित्य यांना गावाच्या बाहेर काढण्यात आले. आदित्य ठाकरे गेल्या नंतर बराच वेळ गावात गोंधळ सुरू होता.