छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखांची तपासणी केल्यानंतर कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या ६८४ नोंदी आढळल्या आहेत. त्या नोंदीनुसार संबंधितांना जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याचे आदेश शासनाने ३१ ऑक्टोबर रोजी दिल्यानंतर १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात प्रमाणपत्र देण्याचा श्रीगणेशा झाला. चौका येथील चार व फुलंब्रीतील ३ कुटुंबांनी अर्ज केल्यानंतर त्यांना उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, फुलंब्री-पैठणचे उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र देण्यात आले.
महसूल अभिलेखात ३३६, शैक्षणिक अभिलेखात २३९, कारागृह अधीक्षक १६, मुद्रांक विभाग, सेवा अभिलेखात प्रत्येकी १, भूमी अभिलेखात ९१ अशा एकूण कुणबी जातीच्या ६८४ नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे नातेवाईकांना कुणबी जातप्रमाणपत्र मिळणार आहे. ११ विभागातील ४४ प्रकारची अभिलेखे प्रशासनाने तपासली. यामध्ये महसुली अभिलेखे १५३५३४७, जन्म मृत्यू नोंदी १२५५९, शैक्षणिक अभिलेखे ३५४२११, कारागृह अधीक्षक १४२७०, पोलीस विभाग १५०५६, मुद्रांक विभाग ८९४३६, भूमी अभिलेख २८८०१९, वक्फ बोर्ड ५६५, १९६७ पूर्वीच्या सेवापुस्तिका १९८ अशा एकूण २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखे तपासले.
एसडीएम कार्यालयातून चार प्रमाणपत्रेछत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकारी रोडगे यांच्या कार्यालयातून मराठा-कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देताना निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांची उपस्थिती होती. चौका येथील जय पवार, रिया पवार यांच्या खापर पणजोबांची नमुना नंबर १ मध्ये नमूद मराठा-कुणबी जात नोंदीआधारे प्रमाणपत्र दिले.सौरभ पवार यांच्या खापर पणजोबांच्या खासरा पत्रात मराठा- कुणबी जात नोंदी आधारे तर विराट पवार यांच्या खापर पणजोबांच्या नमुना नंबर १ मधील नोंदी आधारे प्रमाणपत्र दिले.
फुलंब्रीतील तिघांना प्रमाणपत्रपैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांच्या कार्यालयातून फुलंब्रीतील तिघांना जात प्रमाणपत्र दिले. परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांची उपस्थिती होती. फुलंब्री तालुक्यातील कवीटखेडा येथील रामेश्वर कोलते यांच्या आजोबांचे १९५१ च्या खासरा पाहणीपत्रात मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आधारे प्रमाणपत्र दिले. महाल किन्होळा येथील अनिल कापरे यांच्या आजोबांचे सन १९५१ चे खासरा पाहणी पत्रातील नोंदीच्या आधारे तर गणेश तुपे यांच्याही आजोबांच्या खासरा पाहणी पत्रातील नोंदणीनुसार प्रमाणपत्र देण्यात आले.