छत्रपती संभाजीनगर : बांधकाम क्षेत्र देशात सर्वाधिक रोजगार निर्मिती करत आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध धोरण आणत आहे. त्यातीलच एक म्हणजे लवकरच महाराष्ट्रातून एन. ए. (अकृषी कर) हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. खरेदीच्या वेळीसच एकदाच ‘एनए’ भरावा (वन टाइम टॅक्स) लागेल. नंतर भरण्याची गरज नाही, यामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होईल; पण नागरिकांचा मोठा त्रास वाचणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
बांधकाम व्यावसायिकांची राज्यातील शिखर संघटना क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुनील फुर्दे यांनी नवीन अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्याकडे सूत्रे सोपविली. माजी सचिव सुनील कोतवाल यांनी नवीन सचिव विद्यानंद बेडेकर यांच्याकडे सूत्रे सोपविली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विखे बोलत होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विखे म्हणाले की, १ जुलैपासून अर्ज केल्यापासून १५ दिवसांत मोजणीचा नकाशा घरपोच मिळेल. किफायतशीर हाउसिंगसाठी सरकारची जमीन देण्याचा सरकार विचार करीत आहे. बांधकाम व्यावसायिकांना दीर्घकालीन मोठे कर्ज देण्यासाठी नवीन बँक तयार केली असल्याचे डाॅ. भागवत कराड यांनी नमूद केले. प्रास्ताविक क्रेडाई छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष विकास चौधरी व सर्वांचे स्वागत महाराष्ट्र क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा यांनी केले. यावेळी राज्यातील ६२ शहरांतील क्रेडाईचे आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी हजर होते.
आता घर स्वस्त करा, नागरिकांना फायदा द्यावाळूचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना वाळू ६०० रुपये ब्रासने मिळेल. वाहतूक खर्च ३०० रुपये अधिक केला तर ९०० ते १ हजार रुपयात प्रकल्पाच्या ठिकाणी वाळू मिळेल. यंदा रेडीरेकनर दर वाढविण्यात आले नाहीत. यामुळे आता बिल्डर्सनी घरांच्या किमती कमी कराव्यात व त्याचा लाभ नागरिकांना द्यावा, असे आवाहन विखे यांनी केले.
महाराष्ट्र क्रेडाईची नवीन कार्यकारिणी पदाधिकारीअध्यक्ष प्रमोद खैरनार, सचिव विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष महेश साधवानी, रसिक चव्हाण, सुनील कोतवाल, आदित्य जावडेकर, अनिश शाहा, राजेंद्र यादव, कोषाध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा, सहसचिव दिनेश ढगे, रवींद्र खिल्लारे, शांताराम पाटील, आशिष पोखर्णा, धर्मवीर भारती, राजेश वाजे यांचा समावेश आहे.