Kolhapur Lok Sabha ( Marathi News ) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढल्याने संजय मंडलिक यांना फायदा होणार आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ एमआयएम पक्षानेही शाहू महाराजांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हापूर मतदारसंघाबाबत पक्षाची भूमिका जाहीर केली. एमआयएमने काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा दिल्याने मंडलिक यांच्यासमोरील आव्हान कठीण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी कमकुवत झाल्याचं दिसत होतं. मात्र अशा स्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराज छत्रपतींना निवडणूक लढवण्यास तयार केलं आणि कोल्हापुरातील रंगत वाढली. त्यातच वंचित आघाडीच्या पाठिंब्याने शाहू महाराजांची स्थिती मजबूत झालेली असताना आता त्यांना एमआयमचीही मदत होणार आहे.
कोल्हापुरातून किती उमेदवार निवडणूक रिंगणात?
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. माघारीनंतरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.
उमेदवारांना सोमवारी (दि. २२) दुपारी तीन वाजेपर्यंत आपला अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. कोल्हापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यात काही उमेदवार हे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या व्होट बँकेला धक्का पोहचवू शकतात. त्यामुळे अशा बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे. गत निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १५ उमेदवार रिंगणात होते.