छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने सुरुवातीला १२३ पदे भरण्यास मंजुरी दिली. या पदभरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता २८६ पदांच्या भरतीला शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मनपात सुमारे चारशे पदांची भरती होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. या पदभरतीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
आता मनपात मंजूर पदांची संख्या ५२०२ वर पोहोचली आहे. मात्र, सध्या २ हजार ९६५ कर्मचारी कार्यरत आहेत, तर २२३७ पदे रिक्त आहेत. प्रत्येक महिन्यात मनपाच्या विविध विभागातून किमान १० ते १२ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे २०२१ मध्ये प्रशासनाने १२५ पदांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. या पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली होती. ही भरती प्रक्रिया शासन नियुक्त आयबीपीएस एजन्सीमार्फत राबवली जात आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी या भरती प्रक्रियेला गती देत आणखी २८६ पदांना मंजुरी मिळावी, याकरिता राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मनपाच्या २८६ पदांच्या भरतीलादेखील ग्रीन सिग्नल दिला आहे. शासनाने मनपाच्या आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथिल करून ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच ही भरती प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.
ब, क गटातील मंजूर पदेगट-ब मधील समाज विकास अधिकारी-१, प्रशासन अधिकारी (शिक्षण)-१, सहायक विधि अधिकारी-१ ही तीन पदे भरली जातील. गट-क मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-३२, शारीरिक शिक्षण-६, उपअग्निशमन केंद्र अधिकारी-४, सहायक सुरक्षा अधिकारी-१, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक/अतिक्रमण निरीक्षक-२४, स्वच्छता निरीक्षक- १२, पशुधन पर्यवेशक-७, चालक-यंत्रचालक-१७, अनुरेखक-९, उद्यान सहायक-९, अग्निशामक-१००, रोखपाल-१२, लिपिक टंकलेखक- ५० या प्रमाणे एकूण २८६ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.