छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील १० हजार युवकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यासाठीची जबाबदारी राज्यातील तीन विद्यापीठांवर सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. या विद्यापीठांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या समन्वयाची जबाबदारी नव्यानेच स्थापन झालेल्या कौशल्य विकास विद्यापीठावर सोपविण्यात आली आहे. याविषयीचे निर्णय उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग राज्यासोबत महाराष्ट्र शासनाचा ३० प्रकारच्या कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी करार झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी जर्मन भाषा शिकणे अत्यावश्यक आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पुढाकार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून सुरुवातीला शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण द्यायचे. त्यानंतर तेच शिक्षक नोकरी इच्छुक युवकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देतील, अशी योजना कार्यान्वित केली आहे. त्याच वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठांचे कुलगुरूंसह उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी उपस्थिती लावली. या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथील विद्यापीठाकडे प्रत्येकी ३ हजार आणि पुण्यातील विद्यापीठाकडे ४ हजार युवकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचेही प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
तीन ते सहा महिने प्रशिक्षणजर्मनीमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या युवकांची ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना तीन ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण विद्यापीठांच्या पातळीवर देण्यात येईल. त्यासाठी येणारा खर्च उच्च शिक्षण विभाग करणार आहे. जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी असताना त्या ठिकाणी बोलण्यासाठी किमान प्राथमिक पातळीवर तरी जर्मन भाषा यावी, यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.- डॉ. वाल्मीक सरवदे, प्रकुलगुरू, विद्यापीठ