छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय सफाई आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेसन सोमवारी रात्री अचानक शहरात दाखल झाले. चेंबरमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या तीन मजुरांच्या कुटुंबीयांना अद्यापही प्रत्येकी १० लाखांची मदत न केल्यामुळे त्यांनी जिल्हा व मनपा प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे मंगळवारी सकाळीच ज्योती अंकुश थोरात, सोनाली रावसाहेब घोरपडे यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.
खासगी व्यक्तीच्या सांगण्यावरून सलीम अली सरोवरजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून काम करणाऱ्या तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली नव्हती. व्यंकटेसन म्हणाले की, ड्रेनेज सफाईसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करावा. मजुरांनीही ड्रेनेज चेंबर धोकादायक पद्धतीने साफ करू नये. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, ड्रेनेज चोकअप काढण्याचे काम मजुरांकडून करू नये, महानगरपालिकेकडे सकिंग मशीन, जेटिंग मशीन उपलब्ध आहेत. कोणाला काम करायचेच आहे तर महानगरपालिकेतर्फे त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
मृत मजुरांच्या कुटुंबीयांना धनादेश व्यतिरिक्त त्यांच्या पाल्यांना शिक्षण तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. यावा, शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपायुक्त सोमनाथ जाधव, कार्यकारी अभियंता यांत्रिकी डी. के. पंडित, उपअभियंता अमोल कुलकर्णी, वार्ड अभियंता फारुख खान, कामगार नेते गौतम खरात, गौतम लांडगे आदींची उपस्थिती होती.