छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होतोय. महापालिका प्रशासनासाठी ही भूषणावह बाब अजिबात नाही. राज्य शासनाच्या विशेष सहकार्याने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जानेवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. १ फेब्रवारीपासून शहराला दोन दिवसांआड पाणी देण्यात येईल. ज्या भागात नवीन जलवाहिन्या टाकलेल्या आहेत, त्यांना तूर्त कनेक्शन देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
शहरात सध्या दररोज १२२ एमएलडी पाणी येत आहे. पाणी साठविण्याची क्षमता नसल्याने चार दिवसांआड, म्हणजेच पाचव्या दिवशी, तर काही भागांत सातव्या, आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. खंडपीठाने आदेश दिल्यानंतरही पाणीपुरवठ्यात पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही. प्रशासक जी. श्रीकांत यांनीही सध्याच्या परिस्थितीवर आपणही समाधानी नसल्याचे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत संपविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यापूर्वी शासनाने २०० कोटी रुपये ९०० मिमी जलवाहिनी टाकण्यासाठी अनुदान दिले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ३२ किमी जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले. ७ किमी काम बाकी आहे. सोबतच जलशुद्धीकरण केंद्र अपडेट करणे, पंपिंग यंत्रणा बसविण्याचे काम जानेवारीअखेरीस होईल. सध्या जायकवाडी येथे ज्या उद्भव विहिरीतून पाणी उपसा करण्यात येणार आहे, त्याच ठिकाणी ९०० मिमीसाठी यंत्रणा बसविली जाईल. शहरात यातून अतिरिक्त ७० ते ८० एमएलडी पाणी मिळेल. पूर्वी ही लाईन सुरू झाल्यावर जुनी ७०० मिमीची लाईन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तूर्त ७०० मिमीची अत्यंत जीर्ण झालेली जलवाहिनी सुद्धा सुरू ठेवली जाणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.
सिडको-हडको, जुने शहरसध्या महापालिका ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करीत आहे, त्याच वसाहतींना दोन दिवसांआड पाणी मिळेल. ज्या वसाहतींमध्ये नवीन योजनेतून जलवाहिन्या टाकल्या, तेथे तूर्त तरी पाणी देणे शक्य नाही. त्या वसाहतींसाठी टँकरद्वारे पाणी सुरू राहील.
हर्सूलचे पाणीही वाढणारहर्सूल तलावातून सध्या पाच ते सहा एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. या ठिकाणी ४६ लाख रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर दररोज १० एमएलडी पाणी हर्सूल तलावातून घेतले जाईल. १४ वॉर्डांनाही दोन दिवसांआड पाणी मिळेल.