औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची उद्या शुक्रवारी शेंद्रा एमआयडीसी परिसरात मतमोजणी होणार आहे. तेथे मतमोजणीच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्र आणि परिसरात ३५० अधिकारी- कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात २ पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपअधीक्षक, ८ पोलीस निरीक्षक, १९ उपनिरीक्षक, ३०० कर्मचार्यांचा समावेश असून ते शुक्रवारी पहाटे ५ वाजेपासून शेंद्रा येथील मतमोजणी केंद्रावर बंदोबस्तासाठी राहतील. याशिवाय केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) आणि राज्य राखीव पोलीस बल (एसआरपी) स्थानिक पोलिसांच्या मदतीला राहतील. २४ एप्रिलपासूनच शेंद्रा येथील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांचा २४ तास खडा पहारा आहे. मतमोजणीच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी राहील. विजयी अथवा पराभूत उमेदवारांचा निकाल ऐकून गडबड, गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना आखली आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. निकाल ऐकण्यासाठी जाणार्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रापासून एक किलोमीटर अलीकडेच अडविले जाणार आहे. जालना रोडवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी शहर तसेच ग्रामीण वाहतूक पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे.
मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त
By admin | Published: May 16, 2014 12:33 AM