छत्रपती संभाजीनगर : शहर नामांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राजीनामे दिले. सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यासारखे मोठेच नेतेच नामांतर होण्यापूर्वीच संभाजीनगर म्हणत असत व लिहितही असत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत संभाजीनगर नामांतराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यावेळेसच्या मंत्र्यांनी विरोध दर्शवला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्षता वा सर्वधर्मसमभाव मानतो, यावर विश्वास बसत नाही, असे म्हणत हे राजीनामे दिले गेले आहेत.
दुपारी सुभेदारी विश्रांतीगृहात यासंदर्भात पूर्व विधानसभा कायार्ध्यक्ष जावेद नवाज खान व सहकाऱ्यांनी पत्रपरिषद घेतली. हे राजीनामे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्व संबंधितांकडे व शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.राजीनामे देऊन आपण अन्य कोणत्या पक्षात जाणार का? एमआयएममध्ये जाणार का? असे विचारता, असे काही नाही. पण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमप्रणित सर्वपक्षीय धरणे आंदोलनाला आम्ही भेट देऊन सहभागी होणार आहोत, असे जावेद नवाज खान यांनी सांगितले.
नामांतर होण्यापूर्वीच कोणते नेते संभाजीनगर म्हणत होते, असे विचारता सुप्रिया सुळे व रोहित पवार यांची नावे त्यांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, अशी आमची भावना होती. परंतु सत्तेच्या लोभापायी या पक्षाने शहराच्या नामांतर ठरावाला सहमती दिली. यावरून हा पक्ष एका विशिष्ट वर्गाला घेऊन जाणारा पक्ष असल्याची आमची खात्री झाली, असे अन्वर अली खान, समीर मिर्झा, कौसर शेख, अजमत मोहंमद पठाण, मोहसीन अब्दुल्ला शेख, सय्यद महोसीन, शेख अयाज, सय्यद अत्तार मोहंमद, कलीम शेख आमीर, आफताब जावेद खान, समीर जाकेर खान, अश्फाक नसीर पटेल, कलीम इस्माईल शेख, कैसर रशीद शेख यांच्यासह सुमारे ५० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘टाटा’ केला.