पैठण ( छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील इसारवाडीत देशी दारू दुकानाला दिलेले नाहरकत प्रमाणपत्र बोगस असून ते रद्द करावे, या मागणीसाठी महिलांनी, तर दुसरीकडे दारू दुकानाला दिलेली परवानगी रीतसर असून नाहरकत प्रमाणपत्र रद्द करू नये, या मागणीसाठी याच गावातील एका दुसऱ्या गटाने येथील पंचायत समितीसमाेर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
देशी दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेविकेसह सरपंचांनी बोगस ग्रामसभा घेतलेली असून, ते प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी उपोषणकर्ते विजय सुते यांनी केली असून, या मागणीच्या समर्थनार्थ पुरुषांसह दोनशे महिला बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूने याच गावातील काकासाहेब गुंड यांच्या दुसऱ्या गटाने देशी दारूच्या दुकानाकरिता नाहरकत प्रमाणपत्र एकमताने ठराव संमत करूनच दिले असल्याचे म्हटले आहे. याकरिता हे प्रमाणपत्र रद्द करू नये, या मागणीसाठी गुंड यांच्यासह त्यांचे सहकारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
प्रशासनासमोर मोठा पेचपंचायत समितीचे प्रशासन अधिकारी राजेश कांबळे, किशोर निकम यांनी दोन्ही उपोषणकर्त्यांची भेट घेत सर्व बाबींची चौकशी करून नियमांचे उल्लंघन कुणी केले असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. हा प्रश्न कसा सोडवयाचा, याचा मोठा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.