छत्रपती संभाजीनगर : मावळत्या आर्थिक वर्षात (सन २०२३-२४) जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्व घटकाच्या नोंदणीकृत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेचा लाभ देण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाने वर्षभर निधीची प्रतीक्षा केली. अखेर, ३१ मार्च रोजी रात्री शासनाकडून ३० लाख १५ हजार रुपयांचा निधी खात्यावर जमा झाला. त्यामुळे या योजनेचा पेच निर्माण झाला.
दरम्यान, यासंदर्भात समाज कल्याण कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले की, समाज कल्याण विभागाने सन २०२३-२४ या वर्षात मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचे ९० टक्के अनुदानावर वितरण, या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील ५३ ट्रॅक्टर वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यानुसार अनुसूचित जाती व नवबौद्व घटकाच्या नोंदणीकृत बचत गटांकडून ५३ प्रस्ताव प्राप्त झाले. यासाठी या कार्यालयाने निधी उपलब्ध व्हावा म्हणून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार थेट ३१ मार्चच्या रात्री समाज कल्याण कार्यालयाच्या खात्यावर १० ट्रॅक्टरसाठी ३० लाख १५ हजार रुपयांचा निधी जमा झाला.
सध्या निवडणूक आचार संहिता लागू झालेली असल्यामुळे आता जूनमध्ये प्राप्त प्रस्तावांतून केवळ १० बचत गटांनाच ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
लाभार्थ्यांना होणार थेट ट्रॅक्टरचे वाटप
या योजनेंतर्गत स्वयंसहायता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, या हेतूने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येतो. ही योजना डीबीटी तत्त्वानुसार न राबविता समाज कल्याण विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करून पात्र बचत गटांना त्याचे वाटप करते.