'पक्षाच्या जीवावर मोठे होता आणि नंतर शेण खायला दुसरीकडे जाता'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 06:53 PM2019-08-21T18:53:59+5:302019-08-21T18:59:04+5:30
कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी ठणकावले
औरंगाबाद : ‘फक्त पदं आणि तिकिटं पाहिजेत. पक्षासाठी वेळ द्यायला नको. कार्यक्रमांना यायला नको. पक्षाच्या जीवावर मोठे होता... पक्षाचे उपकार विसरून दुसरीकडे शेण खायला जाता. लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे,’ अशा अत्यंत तिखट शब्दांत औरंगाबाद शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार यांनी आज येथे ठणकावले.
माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त सुभेदारी गेस्ट हाऊसजवळील राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एक हजार मेसेजेस पाठवून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते; परंतु तरीही उपस्थिती जुजबीच राहिली. याबद्दलची खंत भाषणातून अनेकांनी व्यक्त केली. एरव्ही पुतळ्यास अभिवादन करून पदाधिकारी व नेते निघून जातात. यावेळी शामियाना उभारून तेथे अभिवादनाचा व भाषणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल यांनी राजीव गांधी यांनी घेतलेल्या विविध निर्णयांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. राजीव गांधींनी संगणक आणले. त्याला त्यावेळी विरोध करणारेच आज त्याचा सर्वाधिक उपयोग करीत आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
इमानदार मावळे सोबत ठेवा...
पक्षात शिस्त राहिली नसल्याची खंत आमदार सुभाष झांबड यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, निवडणूक आली की तोंड एकीकडे, मत तिसरीकडे, त्यालाच काँग्रेस म्हणतात, अशी ओळख झाली आहे. कडक नियम लावा. इमानदार मावळे सोबत ठेवा, असा सल्ला त्यांनी देताच टाळ्यांचा वर्षाव झाला.
प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गणवेशात आले होते; परंतु वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी ते लवकर जात होते. त्यावरूनही थोडासा तणाव झाला. नंतर औताडे हे बोलून व आपली बाजू मांडून गेले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, प्रकाश मुगदिया, इब्राहिम पठाण आदींची यावेळी भाषणे झाली.
किरण पाटील डोणगावकर यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक भाऊसाहेब जगताप, नगरसेवक अय्युब, माजी अध्यक्ष जीएसए अन्सारी, बबनराव डिडोरे पाटील, डॉ. अरुण शिरसाट, अल्ताफ पटेल, प्रियंका खरात, कैलाश उकिर्डे, कैसर आझाद, शेषराव तुपे, बाबूराव कावसकर, अनिता भंडारी, जयपाल दवणे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
एक वाघ परवडतो
शे-शंभर शेळ्या सांभाळण्यापेक्षा एक वाघ सांभाळलेला परवडतो. तुम्ही जा. बिनधास्त सोडून जा; पण तिथे सडल्याशिवाय राहणार नाही. नेत्यांना सुद्धा माझे सांगणे आहे की, पक्षातल्या सडक्या कांद्यांना फेकून द्या. त्यांना बगलेत घेऊन फिरू नका. आज पदाधिकारीसुद्धा यायला तयार नाहीत. पक्षाची अवस्था वाईट होत चालली आहे. जणू काही कुणाच्या घरचे लग्न आहे.राजीव गांधी यांनी देशाला दिशा दिली, अशा नेत्याच्या जयंतीला येत नाही, यापेक्षा वाईट काय? सध्या देशात काही घडले की, त्याला गांधी-नेहरू घराणेच कसे जबाबदार हे सांगण्याची स्पर्धा लागली. या प्रवृत्तीचा मी निषेध करतो, असे नामदेव पवार म्हणाले.