छत्रपती संभाजीनगर : तरुणाई ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत होती, तो नवरात्रोत्सव अवघ्या ६ दिवसांवर येऊन ठेपला आहे. १५ ऑक्टोबरला पहिल्याच माळेपासून ‘गरबा’ खेळला जाणार असल्याने तरुणींची घागरा भाड्याने घेण्यासाठी लगबग सुरू आहे. यंदा बाजारात सर्वांत मोठा ‘जम्बो घागरा’ युवतींचे आकर्षण ठरत आहे. हा घागरा एवढा मोठा आहे की, जी तरुणी हा घागरा परिधान करून ‘गरबा’ खेळेल तिला एकटीलाच १० फूट बाय १० फुटांची जागा लागेल.
डिजिटल प्रिंट घागराबाजारात आलेल्या घागऱ्याला व्यापाऱ्यांनी अजब नाव दिले आहे. यात यंदा डिजिटल प्रिंट घागरा नावीन्यपूर्ण ठरत आहे. घागरा म्हटले की, सर्वांना हाताने केलेले सुंदर नक्षीकाम हे ठरलेले; पण यंदा पहिल्यांदाच डिजिटल प्रिंट घागरा बाजारात आले आहेत. हा सिल्कमध्ये लाइटवेट घागरा आहे.
बाहुबली घागराबाहुबली चित्रपट खूप गाजला. त्याच नावाने ‘बाहुबली घागरा’ही बाजारात आला आहे. यास ९ मीटरचा घागरा असतो त्यावर मोठ्या आकारातील नक्षीकाम केलेले पॅचेस आहेत.
भूलभुलैया घागरा‘भूलभुलैया २’ चित्रपटाचे नाव घागऱ्याला देण्यात आले आहे. यात फोर्थ पीस व थ्री पीस घागऱ्याचा समावेश आहे. या घागऱ्याची उंची थोडी कमी असते.
१७ मीटरचा घेर असलेला घागराबाजारात १७ मीटर घेर असलेल्या घागरा ‘युनिक’ ठरत आहे. हा घागरा परिधान करून जेव्हा युवती गरब्यात गिरकी घेते तेव्हा घागऱ्याचा घेर १० फूट बाय १० फूट जागा व्यापून टाकतो.
११ हजार घागरे व ३ हजार केडिया बाजारातघागरा व केडिया गुजरातमधील अहमदाबाद व सुरत येथून शहरात विविध कापड व्यावसायिकांनी आणले आहेत. विविध डिझाइनमधील या घागऱ्यात भाड्याने देण्यासाठी ३ हजार घागरे व पुरुषांसाठी दीड हजार केडिया उपलब्ध झाले आहेत, तर विक्रीसाठी ८ हजार घागरे व दीड हजार केडिया आणण्यात आले आहेत. असे ११ हजार घागरे व ३ हजार केडिया बाजारात उपलब्ध आहेत.- योगेश मालाणी,व्यापारी