वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील एफडीसी कंपनीसमोरून दुचाकी लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर दादाराव कऱ्हाळे (रा. सिडको, वाळूजमहानगर) हे १५ एप्रिलला दुचाकीवरून (एमएच २०-डीपी-२५७३) कंपनीत कामासाठी गेले होते. कामावरून परत आल्यानंतर कऱ्हाळे यांनी कंपनीसमोर उभी केलेली दुचाकी गायब असल्याचे दिसून आल्याने त्यांनी दुचाकीचोरी झाल्याची तक्रार दिली आहे.
--------------------
बजाजनगरात भगवान महावीर जयंती साजरी
वाळूज महानगर : जैन समाजबांधवांच्या वतीने बजाजनगरात रविवार फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून भगवान महावीर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. बजाजनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जैन स्थानकात रविवारी सकाळी ९ वाजता प. पू. अमित सुधाजी म. सा. यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी नियमांचे पालन करून भगवान महावीर यांचे दर्शन घेतले. मंगलपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उपाध्यक्ष किशोर राका, सचिव चंद्रकांत चोरडिया, प्रवीण तातेड आदींसह समाजबांधवांची उपस्थिती होती.
----------------------
कामगार चौकात रस्त्याची दुरवस्था
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील कामगार चौक ते सीइटीपी प्रकल्प या रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारक, उद्योजक व कामगारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत.
-------------------------
बजाजनगरात सांडपाणी रस्त्यावर
वाळूज महानगर : बजाजनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या चौकातील सेफ्टी टँक चोकप झाले असून, सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून, ते ठिकठिकाणी साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.