-----------------------------
बेशुद्ध पडलेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू
वाळूज महानगर : रहिमपूर शिवारात शेतात बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. सोहेल सलीम पठाण (वय १५, रा. रहिमपूर) हा सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रहिमपूर शिवारात बकरी घेऊन गेला होता. शेतात त्यास विषारी प्राण्याने दंश केल्याने तो बेशुद्ध पडला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाइकांनी सोहेल यास बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
------------------------------
कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : दुचाकीस्वार कामगारास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक गवळे (रा. तीसगाव) हे सोमवारी सांयकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २०- सीडब्ल्यू- १०९४) कंपनीत कामासाठी चालले होते. शिवराई फाट्याजवळ चुकीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने (एमएच २०- एफएस- ७६२१) माणिक गवळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात माणिक गवळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा मुलगा सतीश गवळे यांच्या तक्रारीवरून फरार दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------
पंढरपूर भाजी मंडईत चिखलाची दलदल
वाळूज महानगर : पंढरपुरातील भाजी मंडईत पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाला असून, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना चिखल तुडवीतच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. पाऊस पडल्यानंतर भाजी मंडई परिसरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचते. पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे.
पाटोदा रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजविले
वाळूज महानगर : पाटोदा रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे ग्रामपंचायतीने मुरुम टाकून खड्डे बुजविले आहेत. येथील पेरे चौक ते पाटोदा या जवळपास एक किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागते. वाहनधारकांची गैरसोय थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने या रस्त्यावर मुरुम टाकुन खड्डे बुजविले आहेत.