------------------
नारायणपूर रस्त्याची डागडुजी
वाळूज महानगर : नारायणपूर ते वाळूज रस्त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे वृत्त लोकमतने नुकतेच प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे खडी व मुरुम टाकून बुजवणे सुरू केले. या रस्त्याची डागडुजी करण्याऐवजी डांबरीकरण करण्याची मागणी त्रस्त वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
----------------------
पाटोदा रोडवरील जलवाहिनीला गळती
वाळूज महानगर : बजाज गेट ते पाटोदा रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. एमआयडीसी प्रशासनाने जलवाहिनी व व्हॉल्वची अनेकदा दुरुस्ती केली आहे. मात्र, परिसरातील नागरिक व व्यावसायिक पाणी भरण्यासाठी व्हॉल्व खराब करीत असतात. रात्रीच्यावेळी व्हॉल्वचे नुकसान केले जात असल्यामुळे खोडसाळ नागरिकांना पकडणे शक्य होत नाही.
------------------
तिरंगा चौकात रहदारीस अडथळा
वाळूज महानगर : पंढरपुरातून धरमकाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. या रस्त्यावर दुचाकी तसेच शोरुमच्या नवीन दुचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जातात. शिवाय हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांमुळे ग्राहक गर्दी करीत असल्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होते आहे. याविरुध्द कारवाई करण्यास वाहतूक पोलीस शाखा टाळाटाळ करीत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
----------------------
पंढरपुरात मतदान यादीतून अनेकांची नावे गायब
वाळूज महानगर : पंढरपुरातील मतदान यादीतून अनेकांची नावे गायब झाल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचा आरोप छाया पवार यांनी केला आहे. मतदार याद्या अंतिम करताना अनेक चुका झाल्यामुळे एका वाॅर्डातील मतदाराची नावे दुसऱ्या वाॅर्डात गेली आहेत. दोषी अधिकाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी पवार यांनी निवेदनाद्वारे केली.
-------------------
सलामपुरेनगरात साफसफाई होईना
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरेनगरात साफसफाई होत नसल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. या वसाहतीत ठिकठिकाणी कचरा साचला असून गटारी तुडुंब भरल्या आहेत. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
----------------------------
सिडको वाळूजमहानगरातील भाजीमंडई सुरू करा
वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगरातील अडगळीत पडलेली भाजीमंडई सुरू करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान बचाव संघाने वडगाव ग्रामपंचायतीकडे केली. या ठिकाणी सिडकोने भाजीमंडई उभारुन विक्रेत्यांसाठी ओटेही बांधले आहेत. मात्र, भाजीपाला विक्रेते या ठिकाणी येत नसल्यामुळे ही भाजीमंडई अडगळीत पडली आहे. ही भाजीमंडई सुरु करण्याची मागणी ए. बी. बनकर, व्ही. आर. वराडे यांनी केली आहे.
----------------------
दुभाजकावर टाकतात कचरा
वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्ता दुभाजकावर नागरिक व विविध व्यावसायिक कचरा आणून टाकत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. रस्त्यालगत मच्छी मार्केट व मांसविक्रेते या ठिकाणी मांसाचे अवशेष टाकतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची दुभाजकावर गर्दी होते. या कचऱ्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारक व पादचाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
----------------------------