औरंगाबाद : ‘आपल्या वीज बिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज रात्री ९.३० वाजता आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’ असे बनावट ‘एसएमएस’ वीज ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. जिल्ह्यात असे बनावट मेसेज काही नागरिकांना प्राप्त झाले आहेत. अशा प्रकारचे कोणतेही ‘एसएमएस’ महावितरणकडून पाठविण्यात येत नाहीत. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद अथवा उत्तर देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या; परंतु महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा व्हॉटस्ॲप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी हा ‘एमएसईडीसीएल’ असा आहे. कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणकडून यासाठी येतात फक्त एसएमएसमहावितरणकडून केवळ ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी, तसेच दरमहा वीज बिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीज बिलाची रक्कम आदी माहिती पाठविण्यात येते.