राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या ३०:३० गुंतवणूक घोटाळ्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांना १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ७ ते २५ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना फसविण्यात आले आहे.
पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव, बोकूड जळगाव तांडे, पाटोदे वडगाव, चिंचोली, जांभळी, निलसगाव, जांभळी तांडा, यासह इतर गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी पैशाच्या आमिषापोटी घोटाळ्याचा मास्टरमाइंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड, त्याचा नातेवाईक साथीदार पंकज शेषराव चव्हाण यांच्याकडे कोट्यवधी रुपये जमा केले. हा घोटाळा ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा असून, आरोपीने ६० ते ७० कोटी रुपये मिळाल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील रहिवासी संतोष राठोड याने ३० एप्रिल २०१३ रोजी १ लाख रुपयांच्या बदल्यात ५ ते ७ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याची योजना सुरू केली होती. योजनेत पहिले तीन महिने परतावा मिळत नसे. चौथ्या महिन्यापासून ठरलेली रक्कम देण्यास सुरुवात केली जात होती. या योजनेतून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा होऊ लागले. त्याने गाडीचा नंबर ३०३०, मोबाइलच्या क्रमांकाचे शेवटचे अंक ३०३० असेच घेतले. त्याच्या एजंटांनीही स्वत:च्या गाड्या, मोबाइल क्रमांकाच्या शेवटी ३०३० नंबर घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे राठोडच्या योजनेला ३०:३० नावानेच ओळखले जाऊ लागले.
ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांच्या परताव्याचे पैसे देण्यासाठी संतोष राठोड आलिशान गाड्यांचा ताफा घेऊनच गावात जात होता. त्यातून शेतकऱ्यांचा विश्वास बसू लागला होता. डीएमआयसी प्रकल्पाच्या भूसंपादनापोटी मिळालेल्या पैशांतून लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या योजनेत केली.
असा झाला फुगवटाnमार्च-एप्रिल २०२१ मध्ये थकीत परतावा दिला. तेव्हा ज्यांनी दहा लाख रुपये गुंतवणूक केली, त्यांना अडीच लाख रुपये मिळाले होते. nएजंटांनी परताव्याचे पैसे दिल्यानंतर शेतकरी ते पैसे मूळ रकमेत जमा करण्यास सांगत. त्यामुळे एका महिन्यातच १० लाखांचे साडेबारा लाख रुपये व्हायचे.nत्यातून या घोटाळ्याची व्याप्ती ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
असे फुटले बिंगफेब्रुवारी २०२१मध्ये या घोटाळ्याविषयी वृत्त बाहेर आले. त्यानंतर आरोपी संतोष राठोडने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये परतावा दिला. त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली, मात्र परतावा काही मिळाला नाही. त्यामुळे ज्योती ढोबळे या महिलेने बिडकीन ठाण्यात १६ नोव्हेंबर २०२१ रोजी तक्रार दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याने राठोडला जामीन मिळाला. यानंतर २१ जानेवारी २०२२ रोजी दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याची दुसरी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष राठोड यास बेड्या ठोकल्या गेल्या.