- प्रा. सुनीती धारवाडकर
आपली जीवसृष्टी विविधतेने नटलेली आहे. ही जैवविविधता पर्यावरण स्थिरतेचा पाया आहे. निसर्गामध्ये जेवढे जास्त वैविध्य असते, तेवढी त्याची स्थिरता आणि पुन:निर्मिती क्षमता जास्त असते. मानवी समाजाच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी जैवविविधता महत्त्वाची ठरते. त्यामध्ये पीक वैविध्याची भूमिका महत्त्वाची आहे. पीक वैविध्य हे सकसतेबरोबरच पर्यावरणाचा पायाही ठरते. निसर्गाची पुन:र्निर्मितीची क्षमता वैविध्याबरोबर वाढत जाते. ही अन्नव्यवस्था आजही अनेक जनसमूहाच्या जगण्याचा आधार आहे.
औद्योगिक क्रांतीने निसर्गातील नाती बदलून गेली. एकजातीय लागवडीला प्रोत्साहन दिले गेल्यामुळे नाचणीसारखी पोषणमूल्यांत सरस असलेली पिकेही नाकारली गेली. चिरस्थायी पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असलेल्या फेरपालट व संमिश्र पीकपद्धती आणि मिश्र-पिकेही नष्ट होऊ लागली. संकरित वाणाच्या दबावाखाली पारंपरिक सरळ वाण हरवून गेले (१९५०). वरण-भात, भाजी-भाकरी अशा वैविध्यपूर्ण अन्नातूनच प्रथिने, कर्बोदके, मेद अशा विविध प्रकारच्या पोषण मूल्यांची आपली गरज भागवली जाते. कडधान्य, नाचणी, बाजरी, डाळी विभिन्न प्रकारच्या पोषक पदार्थांच्या -जीवनसत्त्व अन्नपोषकद्रव्यांच्या-प्राथमिक गरजा भागवतात; पण त्याजागी एक प्रकारची एकल संकरित पिके आली. केवळ गहू, वा द्राक्षे वा ऊस अशी लागवड होऊ लागली. एकात्मिक शेती-पद्धतीला सुरुंग लागला. नंतरच्या काळात (१९८०-९०) शेतीमधील जनुकक्रांतीने जनुकीय बदल केलेली बियाणे (जी. एम.) आणली. सोया, कॅनोला, तांदूळ, वांगी, काकडी, मिरची या जनुकीय बदल केलेल्या पिकांमुळे विभिन्न एतद्देशीय पिके दूर सारली जाऊ लागली. खाद्यान्नात एकसाची पद्धती आली.
आता मात्र हळूहळू आपल्याला पीक वैविध्याचे महत्त्व समजत आहे . एकच प्रकारचे फास्ट फूड खाण्याऐवजी ‘मल्टी ग्रेन’कडे लोकांचा कल झुकत आहे. पीक वैविध्य राखणे पर्यावरणासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, हे जैवविविधता दिनादिवशी आपण लक्षात घेऊन, त्यादृष्टीनं पावले टाकायला हवीत!
शेतीची सुरूवात झाली कधी?मानवाने सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात केली आणि अनेक प्रकारच्या पिकांचा विकास करून जैवविविधतेत भर टाकली. त्याने रानटी गवताचे रूपांतर गव्हात केले. हळूहळू ज्वारी, बाजरी, नाचणी अशी धान्ये आणि पालेभाज्या विकसित केल्या. पिढ्यान्पिढ्यांच्या त्यांच्या संकरणातून आपली अन्नव्यवस्था उदयाला आली. हजारो वर्षांच्या अनुभवातून शेतकऱ्यांनी या निसर्ग-प्रयोगशाळेत नाना प्रकारच्या पीक-प्रजातींचे प्रजनन केले.