पुस्तकी ज्ञानापेक्षा, रोज सकाळ आणि संध्याकाळी वडिलांनी टाकलेले तांदूळ खाण्यासाठी आमच्या अंगणात जमणारा चिमण्यांचा मोठा थवा आणि कमी जागेत आई-वडिलांच्याच प्रयत्नांनी बहरलेली परसबाग, त्यातील जपलेली फळाफुलांची रोपटी, त्यावर गुंजन करणाऱ्या मधमाशा व फुलपाखरे, त्यांना खायला येणारे बेडूक, सरडे, पाली, क्वचित साप आणि पक्षी यांनीच मला जैवविविधता जास्त समजली.
अलीकडच्या काळापर्यंत निसर्ग आणि जैवविविधता या संज्ञा शहरी भागातील सुशिक्षित लोकांशी मर्यादित होत्या आणि त्यातील ‘महत्त्वाच्या’ घटकांचे संवर्धन करण्यासाठी ते अभ्यासपूर्वक प्रयत्नशील होते; पण साप दिसला की तो मारला जायचा. याउलट, या सर्व घटकांशी एकरूप झालेल्या, प्रत्येक क्षण निसर्गाच्या सान्निध्यात घालविणाऱ्या ग्रामीण भागातील समाजाला निसर्ग वेगळ्या पद्धतीने समजला होता आणि त्यांची जीवनशैली निसर्गाशी एकरूप होती. अन्नसाखळी ही आम्ही शाळेत शिकलो आणि त्यामध्ये मानवाचा कधी उल्लेखच नव्हता, हे झाले पुस्तकी ज्ञान. याउलट, त्या साखळीतील मीसुद्धा एक घटक आहे, झाडे तोडली किंवा प्राण्यांची उगाच कत्तल केली की त्याचा त्रास मलासुद्धा होणार हे अनुभवसिद्ध ज्ञान खेड्यापाड्यातील लोकांना होते. निसर्गाशी साधलेली ही समरसता जैविविधतेतील प्रत्येक घटकाचे महत्त्व पटवून देणारी असल्याने देवराई म्हणून प्रत्येक गावाशेजारचे जंगल याच ‘अशिक्षित’ लोकांनी अबाधित ठेवले होते आणि तेथील पानाफुलापासून ते तिथे आढळणाऱ्या सापालासुद्धा इथे अभय मिळाले होते.
जैवविविधता म्हणजे वैविध्यपूर्ण सजीवांचे एकमेकांवर आधारलेले एक सुंदर जग, ज्यामध्ये मानवसुद्धा येतो. यातील प्रत्येक घटक, अगदी जिवाणू किंवा विषाणूसुद्धा, तितकेच महत्त्वाचे. ‘जीवो जिवस्य जीवणं’ या उक्तीने एकमेकांशी बांधील असलेला जैवविविधतेचा प्रत्येक घटक, स्वत:च्या, आपल्यावर आधारित इतर जीवांच्या आणि पयार्याने मानवाच्या संवर्धनासाठी खऱ्या अर्थाने झटत आहेत, हे मान्य केले पाहिजे. आणि हे सत्य जेव्हा समजेल तेव्हा जैवविविधतेतील प्रत्येक घटकाविषयी आपल्या मनात आदर आल्याशिवाय राहणार नाही.
मानव नसला तर जैवविविधतेमध्ये आणि अन्नसाखळीमध्ये काही मोठा फरक पडणार नाही उलट सगळे गुण्यागोविंदाने नांदतील हे सत्य आपण मान्य करू शकतो का? या उपरोक्त, कधी विचार केला आहे का की बेडूक संपले तर काय होईल? साप नष्ट झाले तर कोणती संकटे येतील? सर्व बेडूक कीटक खातात आणि बहुतेक सापांना उंदीर खायला आवडतात. कीटक आणि उंदीर, ज्यांच्या उच्चाटनासाठी मानव अतोनात प्रयत्न करीत आहे, करोडो रुपये त्यावर खर्च करीत आहे आणि कीटकनाशकांच्या रूपात प्रदूषणात वाढ करून स्वत:चे आरोग्य धोक्यात टाकत आहे. अशा घटकांवर ‘नि:शुल्क’ नियंत्रण ठेवण्याचे कार्य बेडूक आणि साप करीत आहेत. हा झाला एक भाग. हेच बेडूक आणि साप इतर मोठ्या सजीवांचे खाद्यसुद्धा आहेत. शिकारी आणि भक्ष्य अशी दुय्यम भूमिका सांभाळत अन्नसाखळी अबाधित ठेवण्याचे महान कार्य त्यांच्याकडून घडत आहे, हेही नसे थोडके. हे सर्व सत्य असताना या प्राण्यांविषयी मानवामध्ये इतकी अनास्था का आहे? आपण त्यांचा तिरस्कार का करतो? बेडूक विषारी नसतात, साप आपला मित्र आहे आणि पालीमुळे विषबाधा होत नाही हे सत्य असले तरी त्यांना आपण, अगदी सुशिक्षित आणि अशिक्षित सुद्धा, नेहमीच घृणास्पद अथवा भीतिदायक नजरेनेच बघत आलो आहोत. साप किंवा पाली म्हणजे विषारी आणि ‘मृत्यू’ हा दुरागृह त्या निष्पाप जिवाविषयी असणाऱ्या भीतीचे मूळ कारण. या जाणिवेची वीण घट्ट करण्याचे काम समर्थपणे चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि वर्तमानपत्रात नेहमी येणाऱ्या बातम्यांनी केले. अशा गैरसमजांमुळे या प्रजातीच्या निसर्गाचा समतोल राखण्याचे आणि मानवाला निरपेक्षपणे मदत करण्याचे महत्कार्य झाकाळले, हे किती दुर्दैवी.स्वत:प्रमाणेच निसर्गातील प्रत्येक घटकावर प्रेम करासध्या निसर्गावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अतोनात वाढलेली आहे; पण यातील किती निसर्गप्रेमींना बेडूक आवडतात, पाल बघितली की ‘किती सुंदर आहे मी तर याच्या प्रेमात पडले’ (अथवा पडलो) असे किती लोकांना मनापासून वाटते? आजही, जेव्हा या प्राण्यांविषयी योग्य ती माहिती समाज आणि प्रसारमाध्यमांवर उपलब्ध असताना, तीच अनास्था, तोच तिरस्कार कायम आहे. माझ्या मते जैवविविधता जपणे म्हणजे नेमके काय तर आपण जसे स्वत:वर प्रेम करतो तसेच त्यातील प्रत्येक घटकांवर, अगदी बेडूक, पाली आणि सापांवर सुद्धा, निस्सीम प्रेम करणे. हे प्रेम आले की आदर येतो आणि निसर्ग संवर्धन, खऱ्या अर्थाने आपले म्हणजेच मानवाचे संवर्धन, योग्य प्रकारे होईल. - वरद गिरी, सरीसृप अभ्यासक