आडूळ (छत्रपती संभाजीनगर): जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची आता बायोमेट्रिक हजेरी नोंदविण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ पैठण तालुक्यातील आडूळ येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेत बायोमेट्रिक मशीन बसवून मंगळवारी करण्यात आला आहे.
आडूळ येथील जि.प. शाळेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग असून येथे ५२७ विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे १४ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक सकाळी शिक्षक उशिरा येतात, लवकर जातात, सतत दांड्या मारतात, अशा सर्वसामान्य पालकांच्या अनेकदा तक्रारी येत होत्या. शिक्षकांची उपस्थिती रजिस्टरवर नोंदणी करून केली जात असल्याने या तक्रारीला काही वेळ बळ मिळत असल्याचा पालकांचा दावा होता. त्यामुळे ग्रामसभेत शाळेत बायोमेट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आडूळ येथील ग्रा. पं. सदस्य द्वारका नारायण पिवळ यांनी स्व:खर्चाने या शाळेला बायोमेट्रिक मशीन उपलब्ध करून दिली आहे. ही मशीन मुख्याध्यापकांच्या दालनात बसविण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ११ वाजता सरपंच बबन भावले यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच बबन भावले, उपसरपंच शेख जाहेर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम पिवळ, माजी उपसरपंच विजय वाघ, शेख जब्बार, राजेंद्र वाघ, रुस्तुम बनकर, मोहसिन तांबोळी, हारुण पठाण, रामू पिवळ, अलका बनकर, सुधीर भालेराव, खुशाल राठोड, मुख्याध्यापिका ज्योती मादनकर, ग्रामविकास अधिकारी अशोक आहेर, रतन चव्हाण आदींची उपस्थिती होती.
बायोमेट्रिक मशीनवर इत्थंभूत माहिती मिळणारयापुढे कोणता शिक्षक सकाळी उशिरा आला ? कोणता शिक्षक लवकर घरी गेला? किंवा रजा न घेता कोणत्या शिक्षकाने दांडी मारली याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच शालेय व्यवस्थापन समितीला कळणार आहे. सर्व शिक्षकांना या बायोमेट्रिक मशीनवर उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शासकीय - खाजगी सर्व कार्यालयात बायोमेट्रिक लावणारआडूळ येथील जि.प. शाळेत शिक्षक उशिरा येतात, तसेच दांड्या मारतात, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची ग्रामसभेत दखल घेऊन बायोमेट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय घेतला. यापुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी तसेच खासगी शाळेतसुद्धा बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे.-बबन भावले, सरपंच.