कडा/शिरूरकासार : स्वस्तधान्य दुकानातून पुरवठा होणाऱ्या धान्याला पाय फुटू नयेत तसेच पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानांमध्ये बायोमेट्रीक प्रणाली राबविण्यात येणार आहे. याची सुरूवात बुधवारी येथे झाली. स्वस्तधान्य दुकानांमधून दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांसह इतर शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदुळ व भरड धान्य योग्य किमतीत दिल्या जाते. गेल्या काही दिवसांमध्ये शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना याचा मोठा लाभ मिळत आहे. स्वस्तधान्य दुकानातून दिल्या जाणाऱ्या धान्याला पाय फुटतात अशी ओरड सातत्याने शिधापत्रिकाधारकांमधून होत असते. अनेकदा शिधापत्रिकाधारकांना चढ्या किमतीने धान्य विक्री केले जाते. तसेच रॉकेल मिळण्यातही शिधापत्रिकाधारकांना अनेक अडचणी येतात. असे प्रकार रोखले जावेत व पात्र लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी आता बायोमेट्रीक प्रणाली राबविण्यात सुरूवात झाली आहे. आष्टी तालुक्यात १९२ स्वस्तधान्य दुकाने आहेत. पहिल्या टप्प्यात ६५ दुकानांमधून ही प्रणाली सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे केरोसीनसाठीही बायोमेट्रीक प्रणाली अवलंबिण्यात येणार आहे. ही प्रणाली राबविण्यासाठी तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील दोघांच्या अंगठ्याचे ठसे घेतले जात आहेत. या दोघांपैकी एकाला धान्य मिळणे सोपे जाणार आहे. या प्रणालीमुळे स्वस्तधान्य दुकानातून मिळणारे धान्य हे लाभार्थ्यांना योग्य दरात व योग्य प्रमाणात मिळेल, अशी आशा नायब तहसीलदार विलास तरंगे यांनी व्यक्त केली. ही प्रणाली लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तहसीलमधील पुरवठा विभाग युद्ध पातळीवर कामाला लागल्याचेही दिसून येत आहे. ही प्रणाली यशस्वी करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. या प्रणालीची दुसरी बाब म्हणजे जे धान्य संबंधित शिधापत्रिकाधारकांनी उचलले नाही ते धान्य पुन्हा पुरवठा विभागाकडे जमा केले जाणार आहे. ही प्रणाली राबविल्यामुळे स्वस्तधान्यातून होणारा गैरप्रकार थांबला जाईल व पात्र शिधापत्रिकाधारकांना योग्य प्रमाणात धान्य मिळेल, अशी आशा आता शिधापत्रिकाधारकांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)शिरूरमध्ये वीस दुकानात बायोमेट्रीक प्रणालीशिरूर तालुक्यात १ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदुळ योग्य किमतीत दिले जात आहेत. हे धान्य लाभार्थ्यांना वेळेवर व योग्य किमतीत मिळावे तसेच एका लाभार्थ्याचे धान्य दुसऱ्यानेच घेऊ नये यासाठी शिरूर तालुक्यात बायोमेट्रीक प्रणालीच्या कामाला बुधवारी सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार भारत सूर्यवंशी, नायब तहसीलदार दिनकर सानप यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले की, शिरूर तालुक्यात २० दुकानांमध्ये बायोमेट्रीक सुरू करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना वेळेवर व पुरेसे धान्य दिले जावे यासाठी पुरवठा विभाग दक्षता घेत असल्याचेही ते म्हणाले.
स्वस्तधान्यासाठी बायोमेट्रीक प्रणाली
By admin | Published: July 17, 2014 12:48 AM