कुरूंदा : राज्य शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अप-डाऊन व दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी बायोमेट्रीक थम्ब मशीन बसविण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत असून, आता अप-डाऊन करणाऱ्या व दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी इतर कार्यालयांतही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. कुरूंदा परिसरातील काही गावांमध्ये असलेल्या विविध कार्यालयांत अपडाऊन करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कुरूंदा पोलिस ठाण्यामध्ये तर मोबाईलद्वारे कर्मचारी बीटमध्ये गेल्याची रवानगी टाकतात. काहीजण तर दुपारी १२ वाजेनंतर धावती भेट देतात. शिरडशहापूर पोलिस चौकीमध्ये कर्मचाऱ्यांची सतत गैरहजेरी असते. कुरूंदा तसेच इतर गावामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी आठवडी भेट देतात. विद्युत कंपनी कार्यालयात विद्युत अभियंता मुख्यालयी न राहता काम पाहतात. पशवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेहमीच वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी असते. पशुंवर कर्मचारीच उपचार करताना आढळतात. शिक्षण क्षेत्रात तर वेगळीच स्थिती आहे. बहुतांश शिक्षक व मुख्याध्यापक मुख्यालयी राहत नाहीत. जवळपास ९५ टक्के शिक्षक अपडाऊन करतात. बसच्या वेळापत्रकाप्रमाणे शाळेचे वेळापत्रक ठरलेले असल्याचे चित्र सर्वच शाळांमध्ये दिसते. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी दोन दिवसआड कार्यालयामध्ये हजेरी लावून कामाचा निपटारा करीत असल्याचे पहावयास मिळते. त्याच बरोबर कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी यांचे तर महिना-महिनाभर दर्शन घडत नाही. ग्रामीण भागातील सर्वच कार्यालयामध्ये अप-डाऊनचा अलबेलपणा सर्रासपणे पहावयास मिळतो. परिणामी विकासकामावर व ग्रामस्थांच्या कामकाजावर परिणाम जाणवत असतो. ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दांडी मारणाऱ्या व अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अद्यापही लक्ष गेलेले नाही. याला चाप बसविण्यासाठी बायोमॅट्रीक थम्ब मशीन बसविण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बायोमेट्रीक थम्ब मशीन बसवून जनतेच्या हिताचे पाऊल उचलले आहे. हीच योजना पोलिस ठाणे, शाळा, ग्रामपंचायत, तलाठी सज्जा, पशवैद्यकीय दवाखाना, विद्युत कंपनी कार्यालयामध्येही लागू करावी, अशी अपेक्षा सर्वस्तरातून व्यक्त होत आहे. कार्यालयामध्ये बायोमेट्रीक थम्ब मशीन लागल्यास ग्रामस्थांना वेळेवर अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे दर्शन घडेल व कामाचा निपटारा होईल. त्या दृष्टिकोणातून सर्व खासगी कार्यालयामध्ये बायोमेट्रीक थम्ब मशीन बसविण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही याचा वापर होत आहे. या धर्तीवर इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये बायोमेट्रीक थम्ब मशीनची मागणी होत आहे. (वार्ताहर)
आरोग्य केंद्राप्रमाणे इतर कार्यालयांतही बायोमेट्रीक?
By admin | Published: June 13, 2014 12:11 AM