छत्रपती संभाजीनगर : विहिरीत पडलेल्या हंस आणि कोंबडीला वाचविण्यासाठी सिडको अग्निशामक दलाने धाव घेतली. त्यांनी ही कामगिरी फत्ते करताच हंस आणि कोंबडीसह स्थानिक नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला.
ओवरगाव जटवाडा येथे पडकी आणि जुनाट विहीर धोकादायक स्थितीत आहे. अन्नाच्या शोधात एक कोंबडी या पडक्या विहिरीत महिन्याभरापासून पडली होती. परिसरातील शेतकरी व नागरिक त्या कोंबडीस खाण्यासाठी अन्नाचे तुकडे टाकत होते. जुनाट व धोकादायक विहिरीत कोण उतरणार व तिला कोण वाचविणार, असा प्रश्न होता. नंतर या विहिरीत एक हंस पक्षीही पडला. अखेर सिडको अग्निशामक विभागाला याची कल्पना देण्यात आली. रविवारी अग्निशमन दलाच्या पथकाने विहिरीतून हंस व कोंबडी रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूप बाहेर काढल्याचे अधिकारी विजय राठोड यांनी सांगितले.
ओवरगाव जटवाडा परिसरात विहिरीत पडलेल्या हंस व कोंबडीला अग्निशमन दलाच्या सिडको विभागाने सुखरूप बाहेर काढले.