पैठण : जायकवाडी जलाशयाच्या परिसरात पक्षी अभयारण्य असतानासुद्धा पक्षी महोत्सवाचा कार्यक्रम १९ जानेवारी रोजी औरंगाबादला साजरा करण्यात येत आहे. जायकवाडी परिसरात पक्षी महोत्सवासाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध असताना पक्षी मित्रांसाठी महत्त्वाचा असलेला हा महोत्सव औरंगाबादमध्ये घेण्यात येत असल्याने येथील पक्षी मित्रांमध्ये नाराजी पसरली आहे.२० जानेवारी रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्यात केवळ पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पक्षी मित्रांसाठी पर्वणी असलेला हा महोत्सव जायकवाडी अभयारण्य परिसरात न घेता औरंगाबादला घेण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतल्याने स्थानिक पक्षी मित्र हिरमुसले आहेत. पक्षी अभयारण्य जायकवाडी परिसरात असताना येथील देशी-विदेशी पाहुण्या पक्षांची सर्वसामान्यांना व हौशी पक्षीमित्रांना ओळख व माहिती मिळावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. गतवर्षीही या महोत्सवाचे आयोजन औरंगाबादला करण्यात आले होते. त्यामुळे यंदा तरी पक्षी महोत्सव जायकवाडीला घेण्यात येईल, असे पक्षी मित्रांना अपेक्षित होते. मात्र वन्यजीव विभागाने पुन्हा औरंगाबादलाच पसंती दिल्याने पक्षी मित्रांमध्ये नाराजी पसरली आहे.कोट....स्थानिक व स्थलांतरीत पक्ष्यांसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणजे नंदनवनच आहे. दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच शेकडोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्षांची शाळाच येथे नित्यनियमाने भरते. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ पक्षीमित्र, पक्षी छायाचित्रकार, पर्यावरण प्रेमी यांचाही येथे मेळा भरतो. ही बाब केवळ औरंगाबाद जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्याच्या दृष्टीनेही भूषणावह आहे. मात्र दुर्दैवाने दरवर्षी आयोजित केला जाणारा पक्षी महोत्सव पैठण शहराबाहेर आयोजित केला जातो. हा अन्यायच आहे.- सुनील पायघन, पक्षीमित्र पैठणपक्षी महोत्सवाचा कार्यक्रम हा याच ठिकाणी व्हायला पाहिजे. औरंगाबाद येथे शहराच्या ठिकाणी पक्षी महोत्सवाचा कार्यक्रम होत असल्याने पैठणकरांवर हा अन्याय झाला आहे.-सूरज लोळगे, नगराध्यक्ष, पैठणपक्षी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन औरंगाबाद येथे शनिवारी होणार असून पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम मात्र जायकवाडी येथे रविवारी होणार आहे.-संजय भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी
पक्षी अभयारण्य जायकवाडीत; महोत्सव मात्र औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:37 AM